बीड: बीड शहरात एका खाजगी क्लासेसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनींचा लैंगिक छळ झाल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. उमाकिरण नावाच्या एका कोचिंग क्लासमधील विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोन शिक्षकांवर लैंगिक छळाचा आरोप आहे. या प्रकरणी, गुरुवारी रात्री ९ वाजता शिवाजीनगर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचा तपशील
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार ३० जुलै २०२४ ते १५ मे २०२५ या कालावधीत घडला. पीडित विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादीनुसार, क्लास संपल्यानंतर आरोपी शिक्षक विजय पवार आणि प्रशांत खाटोकर तिला वारंवार त्यांच्या केबिनमध्ये बोलावून घेत होते. केबिनमध्ये तिच्याशी जबरदस्तीने अश्लील वर्तन केले जायचे. पीडितेने फिर्यादीत सांगितले आहे की, तिला कपडे काढायला लावून तिचे नग्न फोटो मोबाईलमध्ये काढण्यात आले. या घटनेमुळे पीडित विद्यार्थिनीला मोठा मानसिक धक्का बसला. तिच्या पालकांनी तिची चौकशी केली असता, तिने त्यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पालकांनी तातडीने शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली.
आरोपींना राजकीय पाठबळ?
आरोपींपैकी एक, विजय पवार, हा प्रोफेशनल टीचर असोसिएशनचा राज्याध्यक्ष आहे. तो एका स्थानिक लोकप्रतिनिधीचा समर्थक असल्याचेही समोर आले आहे, ज्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यास कोणीही धजावत नव्हते, असे सूत्रांनी सांगितले. त्याचा साथीदार, प्रशांत खाटोकर, हा देखील विद्यार्थ्यांवर दबाव टाकत होता.
पोलीस तपास सुरू
पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर दोन्ही आरोपी फरार झाले आहेत आणि पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी आता विजय पवार आणि प्रशांत खाटोकर यांनी आणखी किती विद्यार्थिनींना लक्ष्य केले असेल याचा तपास सुरू केला आहे. विजय पवार अनेक वर्षांपासून खासगी क्लासेस चालवत असल्यामुळे त्याच्याकडे शिकलेल्या इतर मुलींचाही छळ झाला आहे का, याची चौकशी करण्यात येत आहे. या घटनेमुळे क्लासेसमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांकडून पुढील तपासाची कारवाई वेगाने सुरू आहे.
Leave a Reply