महाराष्ट्रात राजकारण सध्या तापलेलं आहे. मराठी भाषेच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे यांनी ५ जुलै रोजी मोर्चाची हाक दिली आहे. या मोर्चाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षानेही पाठिंबा दिला असून ते या मोर्चात सहभागी होणार आहेत. मात्र, या मोर्चाला अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी जोरदार विरोध केला आहे.
गुणरत्न सदावर्ते यांचा मोर्चाला विरोध आणि इशारा
अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मोर्चाला “ठणठण गोपाळा” म्हटले आहे. त्यांनी हा मोर्चा निघू देणार नाही असा थेट इशारा दिला आहे. ते म्हणाले की, सर्वसामान्यांसाठी जे नियम आहेत, तेच नियम या नेत्यांनाही लागू होतात. त्यांनी पोलिसांना राज ठाकरेंवर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना ताब्यात घेण्याची मागणी केली आहे, कारण त्यांच्या मते या मोर्चासाठी कोणतीही परवानगी नाही. सदावर्ते यांनी हिंदी भाषेच्या मुद्द्यावरही आपले मत मांडले. ते म्हणाले की, हिंदीला विरोध करणे म्हणजे मुलांच्या शिक्षणासोबत खेळण्यासारखे आहे. ते राज ठाकरे यांच्यावर भाषेच्या आणि सांप्रदायिकतेच्या नावावर वाद निर्माण करण्याचा आरोप करत आहेत.
सदावर्ते यांच्या इशाऱ्याला मनसेकडून प्रत्युत्तर
सदावर्ते यांच्या या इशाऱ्यानंतर मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी सदावर्ते यांना भाजपचा पाळलेला माणूस म्हटले आहे. अविनाश जाधव यांनी सदावर्ते यांना थेट मारहाण करण्याचा इशारा दिला आहे. ते म्हणाले, “सदावर्ते ज्या पद्धतीने मराठी माणसांविरुद्ध काम करतो, त्याला घरातून बाहेर पडू देणार नाहीत. मी खात्रीने सांगतो याला मराठी माणूस एक दिवस जाम चोपेल. आमची भाजपला विनंती आहे की, याच्या तोंडाला पट्टी बांधावी, नाहीतर याच्या तोंडात दात नसतील.”
अविनाश जाधव यांनी सदावर्ते यांना आव्हान दिले आहे की, जर त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी दक्षिण भारतात जाऊन असा विरोध करून दाखवावा. यावर, आता हे प्रकरण काय वळण घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Leave a Reply