खासदार संदीपान भुमरेंच्या ड्रायव्हरला १५० कोटींची जमीन ‘हिबानामा’ म्हणून भेट; प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात

छत्रपती संभाजीनगर: शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरे आणि त्यांचे आमदार पुत्र विलास भुमरे यांचा ड्रायव्हर जावेद रसूल शेख याच्या नावावर हैदराबादमधील प्रसिद्ध सालार जंग कुटुंबाकडून तब्बल १५० कोटी रुपयांची जमीन भेट म्हणून देण्यात आली आहे. ‘हिबानामा’ (Hibanama) नावाच्या कायदेशीर दस्तऐवजाद्वारे ही भेट देण्यात आल्याने या प्रकरणाला संशयाचे गालबोट लागले आहे. सध्या छत्रपती संभाजीनगर पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा (Economic Offences Wing – EOW) या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे.

प्रकरण नेमकं काय आहे?

सालार जंग कुटुंबातील वंशज मीर मजहर अली खान आणि त्यांच्या सहा नातेवाईकांनी मिळून छत्रपती संभाजीनगरमधील जालना रोडवरील दाऊदपुरा भागात असलेली ३ एकर जमीन जावेद रसूल शेख याला भेट दिली आहे. ही जमीन रेडिरेकनर दरानुसार कोट्यवधी रुपयांची आहे, तर तिची बाजारभावानुसार किंमत अंदाजे १५० कोटी रुपये असल्याचे बोलले जाते. परभणी येथील एका वकिलाने या संदर्भात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने ड्रायव्हर जावेद रसूलला चौकशीसाठी बोलावले असून, त्याच्याकडे आयकर रिटर्नच्या प्रती, उत्पन्नाचे स्रोत आणि या भेटपत्रावर स्वाक्षरी कोणत्या आधारावर करण्यात आली, याचे स्पष्टीकरण मागवले आहे. जावेद रसूल हा खासदार संदीपान भुमरे आणि आमदार विलास भुमरे यांचा खासगी ड्रायव्हर आहे. या प्रकरणी, आमदार विलास भुमरे यांनी म्हटले आहे की, जावेद रसूल त्यांचा ड्रायव्हर आहे, पण त्याच्या खासगी आयुष्याशी आणि मालमत्तेशी आपला कोणताही संबंध नाही.

हिबानामा’ म्हणजे काय?

‘हिबानामा’ हा मुस्लिम कायद्यानुसार एक कायदेशीर दस्तऐवज आहे, जो एखाद्या व्यक्तीला आपली मालमत्ता (जमीन, घर, दागिने, इत्यादी) कोणत्याही आर्थिक व्यवहाराशिवाय, म्हणजेच निःस्वार्थपणे भेट म्हणून देण्यास परवानगी देतो. ‘हिबा’ हा अरबी शब्द असून त्याचा अर्थ ‘भेट’ असा होतो.

हिबा valid ठरण्यासाठी खालील अटी आवश्यक आहेत:

* भेट देणारा:
सज्ञान आणि सुज्ञ असावा. मालमत्ता त्याच्या मालकीची असावी.
* भेट घेणारा:
कोणताही व्यक्ती (नातेवाईक, मित्र किंवा अनोळखी) किंवा संस्था असू शकते आणि तो ती भेट स्वीकारण्यास सक्षम असावा.
* मालमत्ता:
मालमत्ता अस्तित्वात असावी आणि तिचे हस्तांतरण करता येत असावे.
* ताबा हस्तांतरण:
भेट दिलेल्या मालमत्तेचा प्रत्यक्ष ताबा (possession) देणे आवश्यक असते.
* नोंदणी: १०० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अचल मालमत्तेसाठी ‘हिबानामा’ नोंदणी करणे बंधनकारक आहे. एकदा ‘हिबानामा’ पूर्ण झाल्यानंतर तो सहसा रद्द करता येत नाही. मात्र, फसवणूक किंवा चुकीच्या माहितीवर आधारित असल्यास तो न्यायालयाच्या आदेशाने रद्द होऊ शकतो.

चौकशीचा मुख्य मुद्दा

ड्रायव्हर जावेद रसूल शेख यांचे उत्पन्न आणि सालार जंग कुटुंबाशी असलेले संबंध यावर सध्या प्रश्नचिन्ह आहे. १००-१५० कोटी रुपयांची मालमत्ता कोणालाही विनामोबदला भेट म्हणून देण्यामागे काय कारण आहे, याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे. सालार जंग कुटुंब हे पूर्वीच्या हैदराबाद संस्थानातील प्रतिष्ठित कुलीन कुटुंब होते, ज्यांच्या सदस्यांनी निजामांच्या काळात पंतप्रधान म्हणून काम केले आहे. या कुटुंबाने एका सामान्य ड्रायव्हरला एवढी मोठी जमीन भेट का दिली, हे स्पष्ट होणे बाकी आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *