अकरावी प्रवेशाचा घोळ कायम: विद्यार्थ्यांना ‘तारीख पे तारीख’चा अनुभव

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल लवकर जाहीर करून विद्यार्थ्यांच्या अपेक्षा वाढवल्या होत्या, मात्र अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील सततच्या तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा अपेक्षाभंग झाला आहे. प्रवेश प्रक्रियेला पुन्हा एकदा ‘तारीख पे तारीख’चा अनुभव येत असल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. वेळापत्रकानुसार प्रक्रिया पूर्ण न झाल्याने पहिली गुणवत्ता यादी जाहीर होण्यास पुन्हा विलंब झाला आहे. आता ही यादी ३० जून रोजी प्रसिद्ध केली जाईल असे सांगितले जात आहे, पण या नवीन तारखेवरही विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा विश्वास बसेना झाला आहे. यापूर्वीही अनेक वेळा वेळापत्रक बदलल्यामुळे, आता ३० जूनची तारीख पाळली जाईल का, याबाबत सर्वांच्या मनात शंका आहे.

तांत्रिक अडचणींचा फटका

प्रवेशासाठी वापरल्या जाणाऱ्या सॉफ्टवेअरमध्ये महाविद्यालयांचा ‘कट ऑफ’ दिसत नसल्याने ही तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. या अडचणीमुळे प्रवेश प्रक्रिया रखडली असून, महाविद्यालयेही अभ्यासक्रम वेळेत कसा पूर्ण करायचा या चिंतेत आहेत. संबंधित एजन्सी ऑनलाइन प्रक्रिया योग्य प्रकारे राबवू शकत नाही का, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
प्रवेशाचा हा गोंधळ कधी संपणार आणि विद्यार्थ्यांना वेळेत प्रवेश कधी मिळणार, या प्रश्नाने विद्यार्थी चिंतेत आहेत. प्रवेशाला विलंब झाल्यामुळे शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक विस्कळीत होण्याची भीती निर्माण झाली आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *