कोल्हापूर: ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शुक्रवारी कोल्हापूर येथे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रिकरणाबाबत महत्त्वपूर्ण संकेत दिले. ‘राजकारणात मतभेद विसरून एकत्र येऊन चांगले काम करणे कधीही चांगलेच असते. त्यामुळे सगळे मतभेद विसरून आम्ही एकत्र येत असू, तर ते चांगलेच आहे,’ असे म्हणत त्यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या संभाव्य एकत्रिकरणाबद्दल भाष्य केले. पवार म्हणाले की, मतभेद विसरून चांगले काम केले, तर त्यात वाईट वाटण्यासारखे काही नाही. मात्र, ते एकत्र येतील की नाही, हे सांगायला मी ज्योतिषी नाही.
हिंदी भाषेवरून राज ठाकरेंवर टीका
पवार यांनी यावेळी राज ठाकरे यांच्या हिंदी भाषेवरील भूमिकेवरही टीका केली. ‘पहिली ते चौथीपर्यंत हिंदी भाषा लादणे योग्य नाही; पण भारतात ५० टक्के नागरिक हिंदी बोलतात, त्यामुळे हिंदीला दुर्लक्षित करून चालणार नाही,’ असे ते म्हणाले. हिंदीला विरोध करण्यासाठी निघणाऱ्या मोर्चात कोण कोण येत नाही, हे पाहतोच, ही राज ठाकरेंची भाषा बरोबर नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
मनसे आणि उद्धवसेना एकत्र आल्यास स्वागत
यावेळी मनसे आणि उद्धवसेना एकत्र येतील का, या प्रश्नावरही पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. ‘मनसे आणि उद्धवसेना एकत्र आले, तर ते चांगलेच आहे. दोन भाऊ एकत्र आले तर ते चांगलेच असते,’ असे मत त्यांनी व्यक्त केले. जनसुरक्षा कायद्यात दुरुस्तीला पाठिंबा पवार यांनी जनसुरक्षा कायद्याबद्दल बोलताना सांगितले की, या कायद्यामुळे सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. या कायद्यात दुरुस्ती करण्याचा विचार सुरू असून, त्याला आपला पाठिंबा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Leave a Reply