छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव शिवारात एका धक्कादायक घटनेत हभप संगीताताई अण्णासाहेब पवार (वय ५०) या महिला कीर्तनकाराची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही घटना शनिवारी (२८ जून, २०२५) सकाळी साडेसहाच्या सुमारास उघडकीस आली.
नेमकं काय घडलं?
संगीताताई पवार या गेल्या दोन महिन्यांपासून चिंचडगाव येथील सदगुरू नारायणगिरी महाराज कन्या आश्रमात राहत होत्या. शनिवारी सकाळी आश्रमातील मंदिराचे पुजारी शिवाजी चौधरी नेहमीप्रमाणे पूजेसाठी आले असता, त्यांनी संगीताताईंना आवाज दिला. मात्र, प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी मंदिराशेजारील शेडमध्ये जाऊन पाहिले. तिथे संगीताताई रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. त्यानंतर पुजारी चौधरी यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच वीरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, उपविभागीय पोलीस अधिकारी फुंदे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. श्वानपथक आणि फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले.
हत्येचं कारण अस्पष्ट
प्राथमिक तपासात संगीताताई झोपलेल्या असताना त्यांच्या डोक्यात दगडाने मारहाण करून त्यांची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. पोलिसांना मंदिराचं कुलूप तुटलेलं आढळल्याने चोरीच्या उद्देशाने ही हत्या झाली असावी का, याचाही तपास केला जात आहे. मात्र, मंदिरातील नेमक्या कोणत्या वस्तू चोरीला गेल्या आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेत आहेत.
दोन महिन्यांपासून आश्रमात होत्या
संगीताताईंचे भाऊ कृष्णा पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या दोन महिन्यांपूर्वीच आश्रमात स्थायिक झाल्या होत्या. त्यांनी भागवत कथेसाठी दोन वर्षे वृंदावन येथे वास्तव्य केले होते. त्यानंतर त्यांनी कीर्तन करण्यास सुरुवात केली. सहा महिन्यांपूर्वी नर्मदा परिक्रमा केल्यानंतर त्यांनी घरी न येण्याचा निर्णय घेतला होता.
आमदारांकडून तातडीने कारवाईची मागणी
स्थानिक आमदार रमेश बोरनारे यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले असून, पोलिसांना लवकरात लवकर आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, पुढील तपास सुरू आहे.


Leave a Reply