ठाकरी भाषा; घोर निराशा

काही महिन्यांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी मनसे म्हणजे संपलेला पक्ष असल्याचे म्हटले होते. आपला नेताच असे बोलतो म्हंटल्यावर उद्धव सेनेतील अन्य नेतेही मनसे विरोधात बोलू लागले. मग तेव्हापासून मनसेकडून शिवसेनेला लक्ष्य करण्याची एकही संधी सोडली जात नव्हती. हिंदी सिनेमात येते, तसे अचानक एक भाषिक वळण येते… हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर, दोन्ही ठाकरेंना लक्षात येते की, हे आपले संगीत “भाऊबंदकी” आणि रंगीत “मानापमान” या नाटकांचे प्रयोग थांबवून नवे “नाटक” बसवावे लागणार आहे. त्यासाठी गतकाळाच्या ऐश्वर्याचे गुणगान गात, खडतर वर्तमानाचे दोष दाखवून, प्रेक्षकांची अपार सहानुभूती मिळवणारे, “नटसम्राट” या मराठी माणसांना आवडलेल्या नाटकाची संहिता अगदी सुयोग्य आहे.
” “कुणी सत्ता देता का सत्ता… महाराष्ट्राची नाही, तर मुंबईची… सत्ता देता का सत्ता”, असे आर्त आर्जव करणारी,
“तुफान आता थकलंय, सत्तेसाठी झुकलंय, त्याला थोडी कमवायचीय मालमत्ता… सत्ता देता का सत्ता ” अशा शब्दात, संवाद फेकत *नटसम्राट* आप्पासाहेब बेलवलकर यांची भूमिका उद्धव ठाकरे करतील. त्यांचा एकूण स्वभाव पाहता, ती भूमिका ते जिवंतपणे सादर करतील यात शंका नाही. पण मग प्रश्न उरतो, राज ठाकरे यांचा… त्यांना कोणती भूमिका मिळणार… ?
आज इतक्या वर्षांनी पुन्हा ‘दादू’लाच प्रमुख अभिनेत्याचा मान मिळणार असेल, तर राज यांच्यावर पुन्हा अन्यायच होणार का?
तसे पाहिले तर, या हिंदी भाषा प्रकरणाने राज यांना, त्यांच्या पक्षाला बर्‍यापैकी जीवनदान दिले आहे. ते आपल्या विजय सभेत उद्धव ठाकरे यांना मोठेपणाचा मान देतील, किंवा उद्धव स्वतःहून राज यांच्याशी युतीची चर्चा करतील, ही कल्पना चांगली असली, तरी आजवरचा कौटुंबिक संघर्ष पाहता, दोन्ही कुटुंबातील तणाव पाहता, ही अशक्यप्राय वाटणारी गोष्ट आहे. पण आमच्या वृत्तवाहिन्या आणि त्यांचे अनुकरण करणार्‍या दैनिकातील पत्रकारांना ते पटत नाही. *कारण मराठी बातमीदार बातम्यांची उगमस्थाने विसरले आहेत.* म्हणुन त्यांना उद्धव, राज किंवा अजित, शरद पवार, अगदी गेलाबाजार पंकजा ताई आणि धनंजय मुंडे एकत्र येणार, राजकारण बदलणार, अशा *’आयत्या’* बातम्या हव्या असतात. मग तसे प्रश्‍न विचारून, नेत्यांच्या एका वाक्याने “बाइट”वर खेळायची सवय हल्ली फारच वाढलीय… म्हणुनच हिंदी सक्तीचा विषय जरी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सुरू झाला होता. तरी, त्यावर बोलण्यापेक्षा किंवा नवीन शैक्षणिक धोरण चिकित्सा करण्यापेक्षा “दोघे ठाकरे बंधू एकत्र येणार” ही, ही गेली अनेक वर्षं “ब्रेकिंग न्यूज” बनलेली आहे… जी कधीच खरी झालेली नाही… ही बातमी “वाजवत” राहणे सोपे जाते. याचे कारण अगदी सहज सोपे आहे, पण बहुतांश मराठी पत्रकारांना “ते कळले पण वळले नाही”.
गाडीला चार चाके असतात, ज्यावर ती चालते. पण स्टिअरिंग व्हील एकच असते… आयुष्यभर त्यासाठी भांडणारे केवळ मराठी भाषेसाठी एकत्र येतील, असे मानणे, भोळेपणाचे, खरेतर व्यवहार शून्य बुद्धीचे निदर्शक आहे.
मी १९९६ – ९७ मध्ये पहिल्यांदा राज, स्मिता वहिनी आणि उद्धव यांच्या सत्ता संघर्षावर साप्ताहिक लोकप्रभामध्ये लेख लिहिला होता. राज्यात शिवसेना- भाजप युतीची सत्ता होती. मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी आक्रमक राज आणि प्रभावशाली स्मिता वहिनी यांना रोखण्यासाठी उद्धव ठाकरे यांचे महत्व वाढते राहील असे प्रयत्न सुरू केले होते. त्यामुळे, शिवसेनेचे वटवृक्ष बाळासाहेब ठाकरे यांच्या घरातून तीन नवीन नेते संपूर्ण संघटना कवेत घेण्याच्या प्रयत्नात दिसत होते. बाळासाहेबांच्या रिमोट कंट्रोलचा वापर करण्याची “कला” या राज आणि स्मिता यांच्याकडे होती. त्याचा सगळ्यात जास्त फटका मुख्यमंत्री जोशी यांना बसत असे. त्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला खतपाणी घातले. आपला मुलगा उन्मेष यास उद्धव यांच्या जवळ ठेवले. परिणामी, उद्धव यांचे नेतृत्व झपाट्याने पुढे येताना दिसले. सत्तेच्या कैफात धुंद असलेल्या राज यांनी त्याची दखल घेतली नाही. पण अवघ्या दोन वर्षात दोन्ही भावांमध्ये मोठी दरी निर्माण झाली.
“या दोन्ही भावांच्या सत्ता स्पर्धेने शिवसेनेचे नुकसान होणार ” असे साप्ताहिक लोकप्रभा मधील लेखात मी जरा जास्तच स्पष्टपणे लिहिले होते. त्यामुळे चिडलेल्या उद्धव ठाकरे यांनी मला फोन करून धमकावले होते. तर दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी आमच्या इंडियन एक्सप्रेस व्यवस्थापनाकडे कडक शब्दात तक्रार केली होती. पण लोकप्रभाचे संपादक प्रदीप वर्मा माझ्यामागे खंबीरपणे उभे राहिले होते. अर्थात, त्यानंतर राज ठाकरे मला भाजपच्या महालक्ष्मी रेसकोर्सवर झालेल्या अधिवेशनामध्ये भेटले होते. त्यांनी थोडी नाराजी व्यक्त केली. पण ते तो विषय विसरले होते… पण उद्धव ठाकरे यांनी, मात्र ते कायम मनात ठेवले. असो,
बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना ही मराठी माणसांच्या आवडीची राजकीय संघटना होती. मी “होती” हा शब्द जाणीवपूर्वक वापरला आहे. कारण, ऐंशी, नव्वदच्या दशकातील सामाजिक कार्यामुळे शिवसेनेचे मुंबईतील मराठी माणसांच्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान निर्माण झाले होते…
संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आल्यानंतर सहा वर्षानी, १९६६ साली स्थापन झालेल्या या संघटनेने मुंबई आणि परिसरातील “मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी” लढण्याचा पावित्रा घेतल्याने, “महाराष्ट्र एकीकरण समिती” च्या जागी मराठी माणसे शिवसेनेकडे मोठ्या आशेने पाहू लागले होते…
एकीकडे बाळासाहेब आपले कॉन्ग्रेस सोबतचे राजकीय नाते जपत होते. पण लोक त्याकडे दुर्लक्ष करीत. बाळासाहेबांनी आधी कम्युनिस्ट पक्षाशी असलेले कडवट वैर पुढे निवडणुकीत पाठिंबा देण्यापर्यंत बदलले. तीच गोष्ट प्रजा समाजवादी पक्षाशी युती करताना दिसली. पण या सगळ्या राजकारणात बाळासाहेबांच्या हेतू विषयी लोकांच्या मनात शंका नव्हती. कारण, शिवसेना प्रमुखांच्या जोडीचे खंदे शिलेदार समाजकारण करून लोकांची मने जिंकत होते. नोकऱ्यांसाठी पद्धतशीर लढा देणारी स्थानीय लोकाधिकार समिती, कामगारांना न्याय मिळवून देणारी, भारतीय कामगार सेना, भारतीय विद्यार्थी सेना, महिला आघाडी अशा सेनेच्या विविध आघाड्यांवर आक्रमक नेते लोकांसाठी लढायचे.
मांडवली करणार्‍यांना पक्षात स्थान नसे. या नेत्यांमध्ये, सेनेचे पाहिले नगरसेवक, महापौर आमदार, खासदार झालेले वामनराव महाडिक, दत्ताजी साळवी, सुधीर भाऊ जोशी, मनोहर जोशी, प्रमोद नवलकर, छगन भुजबळ, दत्ताजी नलावडे, गजानन कीर्तीकर, सुधा चुरी, सुभाष देसाई, लीलाधर डाके, गणेश नाईक, नारायण राणे, आनंद दिघे, सतीश प्रधान आदी नामवंत नेत्यांचा समावेश होता. बाळासाहेब मोठ्या कौतुकाने त्यांचा उल्लेख माझे ‘अष्टप्रधान मंडळ’ असा करत असत.
उद्धव आणि राज ठाकरे यांना त्यांच्या भोवती असे नेत्यांचे वलय निर्माण करणे जमले नाही. उलट, जे होते, त्यांना अपमानास्पद वागणूक मिळाल्याने ते एकतर शांत झाले किंवा नारायण राणे, एकनाथ शिंदे यांच्या प्रमाणे बाहेर पडले… असो, तो त्यांच्या स्वभावाचा किंवा ‘राजकीय धोरणाचा’ भाग असू शकतो.
पण, बाळासाहेब आजारी झाल्यावर, गेल्या वीस, पंचवीस वर्षांत या दोन्ही ठाकरे बंधूंनी काय केले आहे?
घरातला सुगी बिल्डर मोठा करणे, मुंबई महापालिकेत अमराठी ठेकेदारांना मालामाल करणे, ठरवून अमराठी नेत्यांना जवळ करणे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे, राजकीय धोरणांमध्ये सातत्य राखणे, ज्यांना जमले नाही, त्यांनी मराठी माणसाला आधार देण्याच्या मोठ्या बाता मारणे विलक्षण आश्चर्यकारक आहे.
राज साहेब, कधी मोदींच्या स्तुतीचा पोवाडा गाणार, तर कधी ‘लाव रे तो विडिओ’ असे फर्मान सोडणार.
उद्धव साहेब, कधी हिंदुत्ववादी आक्रमक धोरण घेणार, भाजप सोबत सत्ता उपभोगणाऱ तर कधी सत्तेसाठी “सर्व धर्म समभाव”ची शिडी वापरुन हट्टाने मुख्यमंत्री पद मिळवणार… सत्तेत असताना यांनी किती मराठी कुटुंबांना स्वस्तात घरे उपलब्ध करून दिली? यांच्या सत्ता काळात म्हाडाच्या, सिडकोच्या घरांचे भाव का वाढवले होते ? यांच्या बिल्डर- पार्टनर मंडळींचा फायदा व्हावा म्हणुन ना?
सत्तेत होते, तेव्हा मुंबैकर मराठी माणसांना मदत व्हावी म्हणुन तुम्ही महापालिकेचा कारभार का सुधारला नाही?
रस्ते, पाणी, वीज अशा मूलभूत सुविधा का महागल्या ?
आणि आता, सत्ता जाताच उद्धव- राज दोघे किती जोमाने, जोषात मोर्चे, सभा घेण्याची भाषा करू लागले…
तुम्हाला काय वाटतं… मराठी लोक दुधखुळे आहेत… बाळासाहेब समजून ते आपल्याला डोक्यावर घेतील… आपण काहीही केले तरी…
कसेही दुटप्पी वागलो तरीही…

पण लक्षात ठेवा,
मुंबईकरांच्या मनात अनेक प्रश्न आहेत.

तो विचारतो आहे…

राज- उद्धव यांच्या राजकारणाने
किती मराठी तरुणांचे आयुष्य खराब झाले, याची या नेत्यांना जाणीव आहे का?
ठाकरे कुटुंबातील नेत्यांमुळे
उर्वरित महाराष्ट्रातील, मुंबईतील किती मराठी कुटुंबांना घरे मिळाली?

आदित्य, अमित किंवा तेजस यांना घरबसल्या कोट्यधीश करणार्‍या राज- उद्धव यांच्या आग्रहाने, किती मराठी मुलांना नोकर्‍या मिळाल्या?

शिव वडापावच्या पाच पंचवीस गाड्या वगळता, या दोघांमुळे
किती नवीन मराठी उद्योजक तयार झाले?
किती नवीन मराठी तरुण तुमच्यामुळे करोडो रुपयांची ठेकेदारी करू लागले ?

किती मराठी सिनेमांना मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आदी मोठ्या शहरांमध्ये मानाचे स्थान मिळाले ?

शिवसेनेच्या किंवा मनसेच्या पुढाकाराने किती नवीन मराठी शाळा सुरू झाल्या ?
किती बंद होणार्‍या शाळा या मराठी प्रेमी नेत्यांनी वाचविल्या ?

राष्ट्रीय स्तरावर मराठी खेळाडू, कलाकार चमकले पाहिजेत, यासाठी आपण काय योगदान दिले ?
किती मराठी विद्वान लोकांना तुम्ही प्रोत्साहन / सहाय्य दिले ?

तर एकूणच काय, तर सत्तेसाठी आपल्या भावाला, त्याच्या पक्षाला एकदा नव्हे दोन निवडणुकीत युतीची बोलणी करण्याचे जो गाजर दाखवतो, बेसावध ठेवून बोलणी फिसकटली असे परस्पर जाहीर करतो, त्याच्याही पुढे जाऊन, ज्याच्या मनसे पक्षाकडे एकही आमदार- खासदार नाही, पण थोडेफार नगरसेवक उरलेत, तेही उद्धव सेना जेव्हा खेचून घेते, तेव्हा, राज आणि त्यांच्या जवळच्या माणसांना, त्या पक्षाला, कार्यकर्त्यांना काय वाटले असेल?

आणि आज हे हाडवैरी भाऊ मुंबई महापालिकेचे आमिष समोर ठेऊन
तात्पुरते एकत्र आले तर ते त्यांच्या लाभासाठी… एकत्र येतील… हे सूर्यप्रकाशा एव्हढे सत्य आहे.

पण मराठी माध्यमे राज – उद्धव यांचे गणित जाणत नसल्यामुळे
मोठ्या उत्साहाने बातम्या देत आहेत… पण एकत्रीकरणाचे गणित फिस्कटले तर पुन्हा या ब्रेकिंग न्यूज हवेत विरून जातील…

तिकडे, आपल्या नेत्यावर, राजसाहेबांवर जीवापाड प्रेम करणारा मनसे सैनिक मात्र आज बाळासाहेबांच्या “मार्मिक”मध्ये उद्धव यांच्या बरोबरीने राज हे सुद्धा “वाघ” आहेत. हे खुल्या दिलाने मान्य केल्यामुळे खुष आहेत… उद्धव सेनेचे हे राज ठाकरे यांच्यावरील मनसे प्रेम किती दिवस कायम राहील, हे पाच तारखेला, दोन्ही भावांच्या जाहीर जुगलबंदी दरम्यान स्पष्ट होईल… तोवर, ही मराठी प्रेमाची लाट उसळत, फेसाळत रहावी यासाठी आमचे पत्रकार बांधव आहेतच….

महेश म्हात्रे
महाराष्ट्र रिसर्च सेंटर

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *