बीड: बीडमधील एका खासगी कोचिंग क्लासेसमध्ये ‘नीट’ ची तयारी करणाऱ्या एका १७ वर्षीय मुलीच्या लैंगिक छळ प्रकरणात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या आरोपांना संदीप क्षीरसागर यांनी आता जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आरोपी विजय पवार हा क्षीरसागर यांचा निकटवर्तीय असल्याचा आरोप मुंडे यांनी केला होता. त्यावर क्षीरसागर यांनी म्हटले की, या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर लगेचच आरोपीला अटक झाली आणि ते पोलिसांना तपासात पूर्ण सहकार्य करत आहेत.
संदीप क्षीरसागर यांनी मुंडे यांच्यावर निशाणा साधत म्हटले की, “मी त्यांच्यासारखा १५० दिवस पळून गेलो नाही.” मुंडे यांनी मंत्रीपद गमावल्यामुळे त्यांना दुःख झाले आहे आणि त्यामुळे ते असे आरोप करत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. ते पुढे म्हणाले की, या प्रकरणात एसआयटी चौकशीची मागणी योग्य आहे आणि त्याला त्यांचा पाठिंबा आहे. आरोपी त्यांच्या जवळचा असला तरी पोलिसांनी कोणतीही तडजोड न करता कठोर कारवाई करावी, असे निर्देश आपण दिले आहेत.
क्षीरसागर यांनी मुंडे यांना त्यांच्यावरील ‘मस्साजोग’ प्रकरणी आक्रमक भूमिका घेण्याचा सल्ला दिला. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आहेत आणि त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे, असेही ते म्हणाले. सध्या पोलीस तत्परतेने कारवाई करत आहेत आणि स्वतः सत्तेत असल्याने मुंडे यांनीच या प्रकरणात अधिक जोर लावला पाहिजे, असे क्षीरसागर यांनी म्हटले आहे. पीडितेची भेट घेण्याचा त्यांचा विचार होता, परंतु सध्याची परिस्थिती योग्य नसल्याने त्यांनी तो टाळला, असे त्यांनी स्पष्ट केले.
Leave a Reply