नालासोपारा: नालासोपारा येथे बांधकाम व्यावसायिक जयप्रकाश चौहान (६१) यांच्या आत्महत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. मंगळवारी गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या चौहान यांनी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये, कर्जाच्या वसुलीसाठी दोन पोलीस कर्मचारी मानसिक छळ करत असल्याचे नमूद केले होते. या प्रकरणी आचोळे पोलिसांनी दोन पोलीस हवालदार श्याम शिंदे आणि राजेश महाजन यांच्यासह एका एजंट लाला लाजपत याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.
चौहान यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस हवालदार श्याम शिंदे, राजेश महाजन आणि एजंट लाला लाजपत हे कर्जाच्या वसुलीसाठी चौहान यांच्यावर सतत मानसिक दबाव आणत होते. चौहान यांच्या मुलीने सांगितले की, तिच्या वडिलांनी शिंदेकडून ३२ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते आणि त्यांना २ ते ३ कोटी रुपयांचे कर्ज देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.
आरोपी फक्त मानसिक छळच करत नव्हते, तर चौहान यांची इमारत दुसऱ्या बांधकाम व्यावसायिकाला जबरदस्तीने देण्याची धमकीही देत होते.
सोमवारी रात्री एजंट लाला लाजपत इमारतीत पोहोचला आणि चौहान यांच्याशी त्याचा जोरदार वाद झाला. या दरम्यान, त्याने चौहान यांना श्याम शिंदेसोबत फोनवर बोलायला लावले. ही संपूर्ण घटना जयप्रकाश चौहान यांच्या पत्नी आणि मुलीसमोर घडली होती. सुरुवातीला आचोळे पोलिसांनी अकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला होता. मात्र, सुसाइड नोट आणि पुढील तपासाअंती दोन्ही पोलीस कर्मचारी व एजंट दोषी असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली असून, त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
Leave a Reply