नांदेड, ४ जुलै २०२५: बीड जिल्ह्यातील बोगस पीक विमा घोटाळ्याच्या धर्तीवर आता नांदेड जिल्ह्यातही असाच एक मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. २०२४ पासून, तब्बल ४ हजार ४५३ शेतकऱ्यांच्या नावावर ४० सामान्य सुविधा केंद्र (CSC) चालकांनी बनावट पीक विमा भरल्याप्रकरणी नांदेड येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या ४० केंद्र चालकांपैकी ९ जण एकट्या बीड जिल्ह्यातील परळी येथील आहेत, तर काही महाभागांनी उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या नावानेही नांदेड जिल्ह्यात पीक विमा भरल्याचे समोर आले आहे.
काय आहे नेमका प्रकार?
शासनाची पंतप्रधान पीक विमा योजना, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमार्फत चालविली जाते. या योजनेचा गैरवापर करत काही सामान्य सुविधा केंद्र चालकांनी शासनाच्या मालकीच्या, विविध संस्थांच्या नावावर असलेल्या किंवा करार/संमतीपत्र नसलेल्या जमिनींवर शेतकऱ्यांच्या नावे पीक विमा भरला आहे. यामुळे शासनाची आणि शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांचा विस्तार
या प्रकरणात आतापर्यंत ४० सेतू सुविधा केंद्र चालकांची नावे पुढे आली आहेत. यामध्ये परळी (बीड), परभणी, पुणे, लातूर, जालना, नांदेड तसेच उत्तर प्रदेशातील सामान्य सुविधा केंद्र चालकांचा समावेश आहे. विशेषतः, बीड जिल्ह्यातील नऊ सुविधा केंद्र चालकांचा या नांदेडातील घोटाळ्यात थेट सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.
विरोधकांची सरकारवर टीका
या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर, विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. शेतकऱ्यांना सरकार काहीही फुकट देत नाही, उलट जीएसटीच्या माध्यमातून त्यांच्याकडून ११ हजार रुपये घेतले जातात, असा आरोप विरोधकांनी केला आहे. या बोगस पीक विमा घोटाळ्यामुळे पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटी आणि सामान्य सुविधा केंद्रांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
Leave a Reply