शिक्षक भरती घोटाळ्याच्या चौकशीसाठी राज्यस्तरीय एसआयटी स्थापन होणार

मुंबई: महाराष्ट्रात २०१२ पासून शिक्षक भरतीवर बंदी असतानाही, २०१९ ते २०२५ या काळात मोठ्या प्रमाणावर बोगस शालार्थ आयडी (वेतन आयडी) तयार करून शिक्षक भरती घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. या घोटाळ्याच्या सखोल चौकशीसाठी राज्यस्तरीय विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याची घोषणा शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केली.

आमदार सुधाकर अडबाले यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. बोगस शिक्षक भरती प्रकरणात १८ पेक्षा जास्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली असून, त्यांनी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून १० ते ३० लाख रुपये उकळल्याचे समोर आले आहे. या शिक्षकांना पाच वर्षांपर्यंत वेतनही देण्यात आले, ज्यामुळे सरकारची ९०० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. आमदार संदीप जोशी यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एसआयटी नेमण्याची मागणी केली होती. या घोटाळ्याची व्याप्ती ‘चांदा ते बांदा’ अशी असून, एसआयटीची कार्यकक्षा संपूर्ण महाराष्ट्रात असावी, अशी मागणीही त्यांनी केली.

घोटाळ्याची व्याप्ती:

नागपूर आणि अनेक जिल्ह्यांतील शाळांमध्ये सर्वाधिक बोगस शालार्थ आयडी तयार करण्यात आले आहेत. मुंबई, नागपूर, भंडारा, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारची प्रकरणे उघडकीस आली आहेत.

एसआयटीची स्थापना

या घोटाळ्याची व्याप्ती पाहता, सखोल चौकशीसाठी राज्यस्तरीय एसआयटी स्थापन केली जाईल, असे डॉ. भोयर यांनी सांगितले. सध्या या घोटाळ्याची चौकशी पोलीस आणि शिक्षण संचालकांकडून सुरू आहे. मात्र, अधिक सखोल चौकशीसाठी विधिमंडळ अधिवेशन संपल्यानंतर एका महिन्याच्या आत मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने आयएएस, आयपीएस आणि विधी अधिकारी यांचा संयुक्त सहभाग असलेली राज्यस्तरीय एसआयटी स्थापन करण्यात येईल, असे डॉ. भोयर यांनी स्पष्ट केले.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *