छत्रपती संभाजीनगर: परभणी येथील न्यायालयीन कोठडीत झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने महत्त्वपूर्ण अंतरिम आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती विभा कंकणवाडी आणि न्यायमूर्ती संजय देशमुख यांच्या खंडपीठाने, सोमनाथच्या आई विजयाताई सूर्यवंशी यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने, संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात आठ दिवसांच्या आत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश परभणीच्या मोंढा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना दिले आहेत.
तपासी अधिकारी आणि आरोपी सारखेच?
विजयाताई सूर्यवंशी यांनी ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. ॲड. आंबेडकरांनी युक्तिवाद केला की, या प्रकरणात तपास यंत्रणांनी बजावलेल्या नोटिसा बेकायदेशीर आहेत, कारण तपासी अधिकारी आणि गुन्ह्यातील आरोपी सारखेच आहेत. तसेच, नोटिसीतील मजकूर दिशाभूल करणारा असल्याचेही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले.
एफआयआर पोलिसांवरच दाखल करण्याचे निर्देश
या प्रकरणात पोलिसांवरच प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल झाला पाहिजे, असे ॲड. आंबेडकरांनी ठामपणे सांगितले. त्यांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १९६ नुसार कोठडीतील मृत्यूची चौकशी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी करतात, परंतु त्यानंतरची कायदेशीर पावले कोणती हे स्पष्ट केलेले नाही, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणले. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये पुढील कार्यवाहीसाठी नियमावली ठरवण्याची गरज त्यांनी सुचवली.
तपासासाठी उपअधीक्षक दर्जाचा अधिकारी
खंडपीठाने या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधीक्षक (DySP) दर्जाच्या अधिकाऱ्याकडे सोपवण्याचे निर्देश परभणीच्या पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. या कोठडीतील मृत्यू प्रकरणात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत तब्बल ७१ पोलीस कर्मचाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आला होता.
इतर मागण्यांवर १० जुलै रोजी सुनावणी
ॲड. आंबेडकरांनी राज्य सरकारने सीआयडीची नियुक्ती केली असली तरी, न्यायालयाच्या अधीन राहणारी विशेष तपास समिती (एसआयटी) नेमण्याची मागणीही केली होती. याचिकेतील इतर विनंत्यांसंदर्भात १० जुलै रोजी होणाऱ्या सुनावणीत विचार करण्यात येणार आहे. सोमनाथला परभणीत संविधान प्रतिकृतीच्या अपमानानंतर उसळलेल्या दंगलीनंतर पोलिसांनी अटक केली होती. त्याचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता. याला अनैसर्गिक मृत्यू संबोधून तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला होता.
Leave a Reply