बीड: सावकारीच्या क्रूर जाचाला कंटाळून बीडमध्ये एका कापड व्यावसायिकाने आपले जीवन संपवले आहे. वेळेवर पैसे न दिल्यास, “तुझी पत्नी माझ्या घरी आणून सोड” अशी धक्कादायक धमकी सावकाराने दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या व्यावसायिकाने गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. बीड शहरातील पेठ बीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे राम फटाले यांनी सात वर्षांपूर्वी एका सावकाराकडून अडीच लाख रुपये दहा टक्के व्याजाने घेतले होते. त्यांनी दरमहा २५ हजार रुपये प्रमाणे पैशांची परतफेड देखील केली. मात्र, पैसे देऊनही सावकारीचा छळ थांबला नाही. सावकाराने राम फटाले यांचा वेळोवेळी मानसिक छळ केला, आणि पैशांची वेळेवर परतफेड न झाल्यास पत्नीला घरी आणून सोडण्याची धमकी दिली. या सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून राम फटाले यांनी चार पानी सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली.
या प्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात सावकार डॉ. लक्ष्मण जाधव आणि त्याच्या पत्नीसह एकूण सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी तिघांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी एक पथक रवाना केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी डॉ. लक्ष्मण जाधव हा भाजपचा पदाधिकारी आहे.
गेल्या एका महिन्यात जिल्ह्यात सावकारी जाचाला कंटाळून दोघांनी आत्महत्या केल्याच्या घटना ताज्या असतानाच, ही तिसरी घटना समोर आल्याने सावकारीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, सावकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
Leave a Reply