छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर येथील विद्यादीप बालसुधारगृहातील धक्कादायक परिस्थिती आणि ९ मुलींच्या पलायनासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गंभीर दखल घेतली आहे. खंडपीठाने या वृत्ताला ‘सुमोटो’ जनहित याचिका म्हणून दाखल करून घेतले असून, अनधिकृतपणे ८० मुलींना सुधारगृहात ठेवल्याबद्दल आणि त्यांच्यावर होणाऱ्या छळाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ९ मे २०२५ रोजी परवान्याची मुदत संपलेल्या विद्यादीप बालसुधारगृहात अजूनही मोठ्या संख्येने मुलींना ठेवल्याबद्दल न्या. व्ही. व्ही. कंकणवाडी आणि न्या. संजय देशमुख यांच्या खंडपीठाने आश्चर्य व्यक्त केले.
सीसीटीव्ही कॅमेरे आणि छळ धक्कादायक
पोलिसांच्या दामिनी पथकाने पलायन केलेल्या मुलींना ‘बालकल्याण समिती’समोर हजर केले असता, त्यांनी दिलेल्या जबाबात बालगृहातील त्यांच्या खोलीतील सीसीटीव्ही कॅमेरे आणि त्यांच्यावर होणारा छळ या बाबी अत्यंत धक्कादायक असल्याचे मुलींनी सांगितले. खंडपीठाने याला प्राथमिक निरीक्षण म्हणून नोंदवले आहे. खंडपीठाने या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत फातनेश्वरकर यांची ‘न्यायालयाचे मित्र’ (अमेकस क्युरी) म्हणून नियुक्ती केली आहे. या संदर्भात तत्काळ प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल होणे आवश्यक आहे, असे मत खंडपीठाने व्यक्त केले. तसेच, बालगृहातील मुलींना इतरत्र सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करणे गरजेचं असल्याचंही न्यायालयाने नमूद केलं. बालसुधारगृहापुरती मर्यादित नसून, अशा इतर सुधारगृहांमधील परिस्थितीचीही दखल घेतली जाईल, असे खंडपीठाने स्पष्ट केले. सध्या पलायन केलेल्या ९ पैकी ८ मुली त्यांच्या पालकांकडे परतल्या असून, एका मुलीचा शोध अजूनही सुरू आहे.
Leave a Reply