मुंबई: सध्या मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात व्हायरल इन्फेक्शनने थैमान घातले आहे. सर्दी, ताप, घसा खवखवणे आणि खोकल्याच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून, शहरातील रुग्णालये रुग्णांच्या गर्दीने भरली आहेत. हवामानातील बदल, पावसाळ्याची सुरुवात आणि वाढते प्रदूषण यामुळे संसर्गजन्य आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याचे चित्र आहे. शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचले असून, ते वेळेत उचलले जात नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. तसेच, जंतुनाशकांची फवारणीही बंद झाल्याने साथीच्या आजारांना पोषक वातावरण मिळत आहे. महामुंबईतील प्रत्येक रुग्णालयात सध्या ३० ते ४० टक्के रुग्ण व्हायरल इन्फेक्शनच्या लक्षणांसह येत असल्याचे वैद्यकीय तज्ञांनी सांगितले आहे.
लक्षणे आणि धोके:
व्हायरल इन्फेक्शनची सुरुवात साधारणपणे सर्दी, शिंका येणे, ताप आणि घसा खवखवणे या लक्षणांनी होते. मात्र, याकडे दुर्लक्ष केल्यास किंवा वेळेत उपचार न घेतल्यास गुंतागुंत वाढून ब्रॉन्कायटिस, न्यूमोनिया किंवा घशात जळजळ आणि सूज येण्यासारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. काही रुग्णांना डोकेदुखी, अंगदुखी आणि सततचा थकवा देखील जाणवत आहे.
सेंट जॉर्ज रुग्णालयाचे अधीक्षक, डॉ. विनायक सावर्डेकर यांच्या मते, सध्याच्या वातावरणातील बदल आणि आर्द्रतेमुळे व्हायरल इन्फेक्शनचे प्रमाण वाढत आहे. खोकला सातत्याने होत असेल तर तो फुफ्फुसांवर परिणाम करू शकतो, त्यामुळे याकडे दुर्लक्ष न करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. हिंदुजा हॉस्पिटल, माहिम येथील कन्सल्टंट, इमर्जन्सी मेडिसिनचे डॉ. किशोर साठे यांनी सांगितले की, ओपीडीमध्ये दररोज किमान ५० रुग्ण सर्दी, खोकला, तापाच्या लक्षणांसह येत आहेत. ट्रेन आणि बसमधील गर्दीमुळे संसर्ग वेगाने पसरत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
बालके आणि ज्येष्ठांना अधिक धोका
वैद्यकीय तज्ञांच्या मते, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि ज्यांना अस्थमा, सायनस किंवा हृदयविकार यांसारखे आधीपासूनच आजार आहेत, अशा व्यक्तींना या हवामान बदलाच्या काळात संसर्गाचा धोका अधिक असतो. त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे त्यांना लवकर संसर्ग होण्याची शक्यता असते.
काय काळजी घ्याल?
मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी सांगितले आहे की, या आजाराची लक्षणे दिसताच, विशेषतः ज्यांना सहव्याधी आहेत, त्यांनी घरगुती उपायांवर अवलंबून न राहता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
आरोग्य विभागाने दिलेले काही महत्त्वाचे सल्ले
* गरज नसताना गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.
* मास्कचा वापर करा.
* हात स्वच्छ धुवा.
* पौष्टिक आणि प्रोटीनयुक्त आहार घ्या.
* शरीरात पाण्याची कमतरता होणार नाही याची काळजी घ्या आणि मुबलक पाणी प्या.
* संसर्ग टाळण्यासाठी स्वच्छतेचे सर्वसाधारण नियम पाळा.
सध्या फार्मसीमध्येही गोळ्यांपासून ते स्टीम मशीन, कफ सिरप, घशाच्या गोळ्या, मास्क आणि हँड सॅनिटायझर यांच्या खरेदीत वाढ दिसून येत आहे. नागरिकांनी सतर्क राहून योग्य ती काळजी घेतल्यास या व्हायरल इन्फेक्शनचा सामना करणे शक्य होईल.
Leave a Reply