मुंबई: राज्यातील सुमारे ६,५०० अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षकांचे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले ‘शाळा बंद’ आंदोलन अखेर यशस्वी झाले आहे. महाराष्ट्र शासनाने ११ जुलैच्या शासन निर्णयानुसार वाढीव टप्पा अनुदान मंजूर करण्याचा निर्णय घेतल्याने शिक्षकांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे. १८ जुलैपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे शासनाने स्पष्ट केले आहे. शिक्षकांच्या वाढीव टप्पा अनुदानाच्या मागणीसाठी राज्यभरातील अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षकांनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन पुकारले होते. ८ आणि ९ जुलै रोजी त्यांनी ‘शाळा बंद’ आंदोलन केले होते, तर जून महिन्यापासून ते आझाद मैदानावर सातत्याने आंदोलन करत होते. शासनाने २०२४ मध्ये वाढीव टप्पा अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केला होता, मात्र सुरू असलेल्या अधिवेशनात पुरवणी मागण्यांमध्ये कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी होती.
बुधवारी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी शासनाच्या वतीने आझाद मैदानावर आंदोलनकर्त्या शिक्षकांची भेट घेतली. त्यांनी शासनाच्या २०२४ च्या निर्णयानुसार वाढीव टप्पा अनुदान अंमलात आणण्याची घोषणा केली. तसेच, १८ जुलैनंतर ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या घोषणेनंतर शिक्षकांनी आपले आंदोलन स्थगित केले.
विरोधकांवर मुख्यमंत्र्यांचा निशाणा: “तुमच्या काळात एक कवडीही दिली नाही, आता राजकारण का करता?”
शिक्षकांच्या आंदोलनावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठिंबा देणाऱ्या राजकीय पक्षांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “या सगळ्या संस्थांना तुमचे सरकार असताना मान्यता दिली. ‘कायम विनाअनुदानित’ म्हणूनही मान्यता दिली, त्यानंतर ‘कायम’ हा शब्द तुम्हीच काढला. तो काढल्यानंतर एक नवा पैसा तुम्ही दिला नाही. याचा पहिला टप्पा मी मुख्यमंत्री असताना दिला, ४० टक्क्यांचा दुसरा टप्पाही आम्ही दिला.” मुख्यमंत्री पुढे म्हणाले, “मध्यंतरी अडीच वर्षे तुमचे सरकार होते, त्या सरकारच्या काळात फुटकी कवडी तुम्ही यांना दिली नाही. त्यानंतर पुन्हा आमचे सरकार आल्यानंतर, शिंदे मुख्यमंत्री असताना आम्ही निर्णय घेतला. काही अडचणी आहेत त्यामुळे पैसे द्यायला उशीर झाला हे मान्य आहे, पण आम्ही पैसे देणार आहोत.” सरकार या मुद्द्यावर सकारात्मक असून, आंदोलकांशी चर्चा करत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. जेव्हा संधी होती तेव्हा तुम्ही यांच्यासाठी काही केले नाही आणि आता आंदोलनात जाऊन तुम्ही राजकारण करत आहात, अशी टीका फडणवीस यांनी केली.
यापूर्वी, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आझाद मैदानावर जाऊन शिक्षकांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता आणि त्यांच्या मागण्या तत्काळ मान्य करण्याची मागणी केली होती. विधानपरिषदेत आमदार सतेज पाटील यांनीही शिक्षकांच्या या आंदोलनाचा मुद्दा उपस्थित केला होता.
Leave a Reply