मुंबई: मुंबईत कबुतरांची वाढती संख्या आणि त्यांना दाणे घालण्याच्या प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्याला निर्माण होत असलेल्या धोक्याची गंभीर दखल राज्य मानवी हक्क आयोगाने घेतली आहे. या प्रकरणी आयोगाने सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव आणि मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना नोटीस बजावली आहे. आयोगाचे अध्यक्ष न्या. (नि.) अनंत बदर यांनी स्वतःहून या प्रकरणाची दखल घेतली आहे.
कबुतरांची विष्ठा आणि पिसांद्वारे निर्माण होणाऱ्या धुळीमुळे ६० प्रकारचे रोग होण्याची भीती असते, ज्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊन फुफ्फुसाचे आणि इतर गंभीर आजार होऊ शकतात.
असे असूनही, शहरात कबुतरांना दाणे घालण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहेत, ज्यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होत असल्याबद्दल आयोगाने चिंता व्यक्त केली आहे. राज्य सरकारने यापूर्वीच पालिकेला कबुतरखाने बंद करण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी, कबुतरांना दाणे घालण्याचे प्रकार सुरूच आहेत. यावर सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव आणि मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी आठ दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी १६ सप्टेंबर रोजी होणार असल्याची माहिती आयोगाचे प्रबंधक विजय केदार यांनी दिली.
Leave a Reply