महाराष्ट्राच्या सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात आज विधान परिषदेत शिवसेना (ठाकरे गट) आमदार अनिल परब आणि शिवसेना (शिंदे गट) नेते शंभुराज देसाई यांच्यात मराठी माणसांना मुंबईत घरं मिळण्याच्या मुद्द्यावरून जोरदार शाब्दिक चकमक झाली. हा वाद इतका वाढला की सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब करावे लागले.
नेमकं काय घडलं?
मुंबईतील मराठी माणसांना प्राधान्याने घरं मिळावीत, यासाठी कायदा करणार का, असा सवाल अनिल परब यांनी उपस्थित केला. “मराठी माणसांना प्राधान्यानं घर मिळालं पाहिजे, हा कायदा आहे का? तर नाही. सरकारची इच्छा आहे, मराठी माणसांची इच्छा आहे, आमचं पण तेच म्हणणं आहे, कायदा झाला पाहिजे,” असे परब म्हणाले. यावर उत्तर देताना शंभुराज देसाई यांनी, “२०१९ ते २०२२ या काळात तुम्ही (तत्कालीन सरकारने) असा काही निर्णय घेतला होता का? अशा पद्धतीचा नियम तुम्ही केला होता का? अशा पद्धतीचा कायदा तुम्ही केला होता का? त्यावेळी तो झाला नाही,” असे प्रत्युत्तर दिले.
याचदरम्यान, अनिल परब यांनी ‘गद्दार’ हा शब्द वापरला, ज्यामुळे वाद आणखी चिघळला. शंभुराज देसाई चांगलेच संतापले आणि त्यांनी परब यांना ‘तुम्ही गद्दार कोणाला म्हणता?’ असा सवाल केला. त्यानंतर देसाई यांनी “तेव्हा तुम्ही बूट चाटत होता,” असेही म्हटले. वाढलेला वाद पाहून विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब केले. त्यानंतर वादग्रस्त शब्द रेकॉर्डवरून हटवण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
शंभुराज देसाईंचा इशारा
या प्रकाराबाबत माहिती देताना शंभुराज देसाई म्हणाले की, ते मिलिंद नार्वेकर यांच्या प्रश्नाला उत्तर देत होते. “मुंबईतील मराठी भाषिकांना घरे देण्यात प्राधान्य देण्याचे २०२१ ते २०२२ मध्ये असे कोणतेही धोरण नव्हते, हे सांगितल्यावर अनिल परब यांना राग आला. त्यांनी माझा उल्लेख गद्दार केला, मी पण त्यांना प्रत्युत्तर दिलं, आमच्यात बाचाबाची झाली,” असे देसाईंनी सांगितले.
देसाईंनी पुढे इशारा दिला की, “त्यांनी आता जर प्रकरण वाढवायचं ठरवलं तर आम्ही सुद्धा डबल करू, आम्ही सुद्धा बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत.” या घटनेमुळे विधान परिषदेतील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, दोन्ही गटांमधील तीव्र मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत.
Leave a Reply