मुंबई: छत्रपती संभाजीनगर येथील ‘विद्यादीप’ बालगृहात मुलींना अमानवी आणि अघोरी वागणूक दिल्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी तीन पोलीस निरीक्षकांची समिती नेमण्यात आली आहे. या प्रकरणातून अनेक गंभीर बाबी समोर आल्याने, अधीक्षक आणि इतर जबाबदार व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांची चौकशी सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत घोषणा केली की, या प्रकरणी या संस्थेची मान्यता रद्द करण्यात येईल.
बालगृहात मुलींचे सक्तीने धर्मांतर; विरोध करणाऱ्यांना मारहाण
या बालगृहात मुलींचे जबरदस्तीने धर्मांतर केले जात होते आणि धर्मांतराला विरोध करणाऱ्या मुलींना मारहाण केली जात होती. मुलींच्या खोलीत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते, तसेच मुलींना प्रसूतीच्या गोळ्या दिल्या जात होत्या, असे गंभीर प्रकार आमदार चित्रा वाघ आणि अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून कारवाईची मागणी केली.
चौकशी समितीचा अहवाल लवकरच; दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन
गंभीर गोष्टी बाहेर आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशी समितीचा अहवाल गुरुवारी येणार आहे. जे दोषी असतील त्या सर्वांना निलंबित करण्यात येईल, तसेच सरकारमधील कुठल्याही व्यक्तीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत केली असेल किंवा आपल्या कर्तव्यात कसूर केली असेल तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी उत्तर देताना आश्वासन दिले. आमदार चित्रा वाघ यांनी विधान परिषदेत या विषयाकडे लक्ष वेधले, तर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जिल्हा बालविकास अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली. या बालगृहात ८० मुली आहेत, आधी त्या बोलायला तयार नव्हत्या, पण आता हळूहळू त्या माहिती देत आहेत.
अल्पवयीन मुलींकडून शौचालय स्वच्छता; पिण्यास बाथरूमचे पाणी!
‘विद्यादीप’ बालगृहातील धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. लहान मुलींकडून शौचालयाची स्वच्छता करून घेतली जात होती, त्यांना पिण्यासाठी बाथरूममधील पाणी दिले जात होते. विशेष म्हणजे, या संस्थेकडे नोंदणी क्रमांकच नाही आणि खर्चाचा तपशीलही कुणाकडे नाही, अशी गंभीर माहिती उघड झाली आहे.
‘विद्यादीप’ बालगृहातील ८० मुलींचे भवितव्य अधांतरी
या सर्व गंभीर प्रकारांमुळे ‘विद्यादीप’ बालगृहातील ८० मुलींचे भवितव्य सध्या अधांतरी आहे. शासनाकडून पुढील काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply