ठाणे: मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत ठाकरे बंधू (उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे) यांच्या संभाव्य युती आणि त्याचे आगामी महापालिका निवडणुकीवरील परिणामांबाबत सखोल चर्चा झाल्याचे समजते. भाजपच्या दिल्लीतील नेत्यांमध्ये या संभाव्य युतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. मागील आठवड्यात उद्धव ठाकरे यांनी वरळी येथे मराठीच्या मुद्द्यावर विजयी मेळावा घेतला होता, ज्यात त्यांनी राजकीय युतीचे स्पष्ट संकेत दिले होते. या पार्श्वभूमीवरच शिंदे यांनी शाह यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, महापालिका निवडणुका लांबणीवर टाकण्यासारख्या पर्यायांसह निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा झाली.
भाजपच्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष शाह यांनी शिंदेंना दिले
भाजपने काही खासगी संस्थांमार्फत ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीच्या परिणामांबाबत सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणाचे निष्कर्ष शाह यांनी शिंदे यांना दिले, अशी माहिती सूत्रांनी दिली. या भेटीत शाह यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेची माहिती घेतल्याचे सांगण्यात आले. राज ठाकरे यांच्या भूमिकेची माहिती घेण्यामागे त्रिभाषा सूत्राच्या (Three Language Formula) मुद्द्यावर सुरू असलेल्या वादाची पार्श्वभूमी असल्याचे दिसते. शिंदे सेनेचे शिक्षण खात्याचे मंत्री दादा भुसे यांनी त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा निर्णय रेटला आहे. त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यांना अपयश आले, असे सांगितले जाते. राज ठाकरे यांचा त्रिभाषा सूत्राला नेमका विरोध का आहे आणि त्यांची भूमिका काय आहे, याबाबत शाह यांनी शिंदे यांच्याकडून माहिती घेतली.
राजकीय युती आणि निवडणूक रणनीतीवर चर्चा
ठाकरे बंधू निवडणुकीत एकत्र आले तर त्याचे कसे परिणाम होतील, याबाबत भाजपच्या दिल्लीतील नेत्यांमध्ये चिंता आहे. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी ठाकरे बंधूंना डिवचणारी विधाने केली आहेत. ठाकरे यांच्याविरोधात कठोर भूमिका घेतल्यास काय परिणाम होतील, यावरही चर्चा झाली. राज ठाकरे यांनी अद्याप उद्धव यांच्यासोबत युतीचे संकेत स्पष्टपणे दिलेले नाहीत. त्यामुळे राज यांचे मतपरिवर्तन करण्याची शक्यता किती आहे, याबाबतही चर्चा झाली. ठाकरे बंधूंना लक्ष्य केल्यास मुंबईतील हिंदी मतदार महायुतीच्या मागे उभे राहतील का, तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या युतीचा सामना करण्याकरिता अन्य कोणत्या पक्ष आणि नेत्यांना सोबत घेता येईल, अशा विविध मुद्द्यांबाबत शाह आणि शिंदे यांच्यात चर्चा झाली.
वाद टाळण्याचा आदेश
शिंदे सेनेच्या काही मंत्री आणि आमदारांच्या वक्तव्यांमुळे व कृतीमुळे राज्यात वादंग निर्माण झाले होते. महापालिका निवडणुका होईपर्यंत असे वाद टाळण्याचा आदेश अमित शाह यांनी दिला आहे. महायुती एकसंध असल्याचा संदेश जनतेत जाणे आवश्यक आहे, असे शाह यांनी सुनावल्याचे समजते. दरम्यान, शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावर उद्धवसेनेचे माजी खासदार राजन विचारे यांनी टीका केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘गुरू’ बदलले म्हणून ते दिल्लीला गेल्याचे विचारे म्हणाले. ‘आमचे गुरू येथे ‘मातोश्री’ला बसलेले आहेत,’ असेही त्यांनी सांगितले.
Leave a Reply