मराठवाड्यातील शेतकरी आता बदलत्या उत्पादन खर्चाचा आणि शेतमालाच्या दराचा विचार करून पीक पद्धतीत मोठा बदल करत आहेत. कधीकाळी मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर दिसणारी ‘हायब्रीड’ ज्वारी आता जवळजवळ हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. कापसाच्या लागवडीलाही शेतकऱ्यांनी ‘राम राम’ ठोकला असून, सोयाबीन हे मराठवाड्यातील प्रमुख नगदी पीक बनले आहे. सोयाबीनसोबतच मक्याचा पेराही मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
कापसाची जागा घेणारे सोयाबीन
गेल्या २५ ते ३० वर्षांपूर्वी मराठवाड्यात सर्वाधिक म्हणजेच ४० ते ५० टक्के क्षेत्रावर कापसाची लागवड होत असे. त्यानंतर ज्वारी, बाजरी, कडधान्ये या पिकांचा क्रम होता. मात्र आता लातूर, धाराशीव, नांदेड, बीड, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी कापसाची साथ सोडून सोयाबीनला पसंती दिली आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांतही कापसाचा पेरा घटून सोयाबीन आणि मक्याकडे कल वाढलेला दिसतो. मराठवाड्यात खरीप हंगामात सुमारे ४९.७२ लाख हेक्टरवर पेरणी होते.
आर्थिक व्यवहार्यता हाच केंद्रबिंदू
पीक पॅटर्नमधील या बदलामागे मुख्य कारण आर्थिक व्यवहार्यता आहे. पूर्वी खाण्यासाठी पीक घेतले जायचे, आता पैशासाठी उत्पादन घेतले जाते.
* ज्वारीचे घटते क्षेत्र: ‘हायब्रीड’ ज्वारीचा खाण्यासाठी वापर होत नाही आणि तिला दरही मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यांनी ज्वारीकडे पाठ फिरवली आहे.
* कापसाचा वाढता खर्च: कापूस हे नऊ महिन्यांचे पीक असून, गेल्या काही वर्षांत त्याचा उत्पादन खर्च वाढत आहे, तर दुसरीकडे कापसाचे दर कमी होत आहेत.
* सोयाबीनची पसंती: याउलट, सोयाबीन हे केवळ चार महिन्यांचे पीक आहे. कमी उत्पादन खर्चात चांगले पैसे देणारे पीक म्हणून मराठवाड्यात सोयाबीनचे क्षेत्र वाढले आहे.
कापसाकडे पाठ फिरवण्यामागची कारणे
शेतकऱ्यांनी कापसाऐवजी सोयाबीनला पसंती देण्यामागे काही प्रमुख कारणे आहेत, अशी माहिती निवृत्त कृषी संचालक डॉ. दिनकर जाधव यांनी दिली आहे. त्यांच्या मते, कापूस कमी होण्यास शासनाचे धोरण आणि बोंडअळीचा प्रादुर्भाव कारणीभूत आहे.
गुलाबी बोंडअळीचा हल्ला: बोलगार्ड बियाण्यांची रोगप्रतिकार शक्ती संपली आहे. यामुळे पिकांवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढतो. अळी नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना महागड्या औषध फवारणीचा खर्च करावा लागतो. याशिवाय कापूस वेचणीचा खर्चही अधिक असतो, ज्यामुळे उत्पादन खर्च वाढतो. वाढत्या खर्चाच्या तुलनेत कापसाला चांगला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी आता सोयाबीनकडे मोर्चा वळवला आहे.
Leave a Reply