मुंबई: शंभर वर्षांहून अधिक मोठी परंपरा असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला आता महाराष्ट्राचा ‘राज्य महोत्सव’ म्हणून अधिकृतपणे घोषित करण्यात आले आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी गुरुवारी विधानसभेत ही महत्त्वाची घोषणा केली.
पीओपी मूर्तींवरील निर्बंध बाजूला, निर्मितीला परवानगी
या घोषणेसोबतच सांस्कृतिक कार्यमंत्री शेलार यांनी गणेश मूर्तींवरील निर्बंधांबाबतही विधान केले. पीओपी (प्लॅस्टर ऑफ पॅरिस) मूर्तींवर तत्कालीन सरकारने लावलेले निर्बंध हटवण्यात आले आहेत.
शेलार म्हणाले की, पीओपी मूर्ती पर्यावरणाला घातक आहेत की नाही, याचा सखोल अभ्यास करण्यासाठी राजीव गांधी विज्ञान आयोगामार्फत डॉ. अनिल काकोडकर समितीचा अहवाल घेण्यात आला. या अहवालानुसार, तसेच केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या संमतीने आणि न्यायालयाच्या निवाड्यानुसार, आता पीओपी मूर्ती बनवण्यास आणि विकण्यास कायदेशीररित्या परवानगी मिळाली आहे.
उत्सवात बाधा आणण्याचे प्रयत्न असफल
शेलार यांनी त्यांच्या निवेदनात सांगितले की, काही लोकांनी विविध कारणांनी गणेशोत्सवाच्या सार्वजनिक परंपरेत बाधा निर्माण करण्याचा प्रयत्न विविध न्यायालयांमार्फत केला. मात्र, सरकारने या सर्व निर्बंधांना त्वरित बाजूला करण्याचे काम केले.
सामाजिक आणि राष्ट्रीय परंपरा
लोकमान्य टिळकांनी १८९३ साली सुरू केलेल्या या उत्सवाचा संबंध सामाजिक, राष्ट्रीय, स्वातंत्र्य, स्वाभिमान आणि स्वभाषेशी आहे. गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा गौरव आणि अभिमान असून, देशातच नव्हे तर जगभरात त्याची व्याप्ती वाढवण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध राहील, असे शेलार यांनी स्पष्ट केले. गणेशोत्सव मंडळांनी हा उत्सव उत्साहाने साजरा करताना त्यात सामाजिक उपक्रम, ‘ऑपरेशन सिंदूर’, देशांतर्गत विकासाची कामे आणि महापुरुषांचे योगदान अशा विषयांचा समावेश करावा, असे आवाहनही शेलार यांनी यावेळी केले.
Leave a Reply