मुंबई: मुंबईसह राज्यातील धार्मिक स्थळांवरून भोंगे हटवण्याची कारवाई पूर्ण झाली असून, मुंबई आता पूर्णपणे ‘भोंगेमुक्त’ झाली आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असून, यानंतर जर कोणत्याही धार्मिक स्थळांवर पुन्हा भोंगे लावण्यात आले, तर संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रमुखाला जबाबदार धरण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला. राज्यात आतापर्यंत एकूण ३,३६७ धार्मिक स्थळांवरील भोंगे हटविण्यात आले आहेत. यामध्ये मुंबईतील १,६०८ ठिकाणांचा समावेश आहे, ज्यात १,१४९ मशिदी, ४८ मंदिरे, ९० चर्च, ४ गुरुद्वारा, तसेच १४८ इतर ठिकाणांचा समावेश आहे. मुंबई व्यतिरिक्त राज्यातील इतर भागांतून १,७५९ धार्मिक स्थळांवरील भोंगे हटवण्यात आले आहेत.
विधानसभेत उपस्थित झालेले मुद्दे
भाजपचे ज्येष्ठ सदस्य सुधीर मूनगंटीवार यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून हा मुद्दा उपस्थित केला होता. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ध्वनी प्रदूषणविषयक नियमांच्या अंमलबजावणीसाठी भरारी पथक स्थापन करण्याची घोषणा केली. तसेच, तक्रारकर्त्यास दंडाच्या पन्नास टक्के रक्कम देण्याच्या मूनगंटीवारांच्या मागणीचा सकारात्मक विचार करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
चर्चेदरम्यान, अनिल पाटील यांनी खा. संजय राऊत यांचे नाव न घेता, “रोज सकाळी १० वाजता सुरू होणाऱ्या भोंग्याचे काय?” असा सवाल केला. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी, “ध्वनीप्रदूषणाचा कायदा आहे, त्यावेळी आपली एकच अडचण आहे पण विचाराच्या प्रदूषणाचा कायदा अद्याप व्हायचा आहे तो होईल तेव्हा त्यावर विचार करू,” असा टोला लगावला. दरम्यान, भोंगे काढल्याबद्दल आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे अभिनंदन केले. तसेच, दहीहंडी आणि गणेशोत्सवासारख्या सणांमध्ये तात्पुरते मंडप उभारण्यास परवानगी देताना त्रास होऊ नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
Leave a Reply