अरेरे… डॉ आंबेडकर यांचेही घराणे फुटले

महाराष्ट्रात राजकारण दररोज नवीन वळणे घेत आहे… त्या वेगाने घराघरामध्ये संघर्ष सुरू झाला आहे… मग त्याला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कुटुंब तरी कसे अपवाद राहील… ?
राजकीय जाण, वस्तुस्थितीचे भान आणि निवडणुकीतील मतांच्या प्रमाणाचे ज्ञान हरवलेल्या, मराठी माध्यमांच्या मते, “महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मास्टर स्ट्रोक मारला. त्यांनी शिवशक्ती आणि भीमशक्तीची युती घडवून आणली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेसोबत युती केली.” आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि आनंदराज आंबेडकर यांची रिपब्लिकन सेना एकत्र निवडणूक लढणार आहे. या प्रसंगी आनंदराज आंबेडकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेसोबत युती करण्याचा निर्णय का घेतला, ते सांगितलं.
“महाराष्ट्रात खरं म्हणजे ही युती आजची नाही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रबोधनकार ठाकरे यांच्यापासून सुरु झालेली ही युती आहे. खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात राजकीय, सामाजिक परिवर्तन घडवण्यासाठी आम्ही दोन्ही कार्यकर्ते एकत्र आलोय. मी मुद्दाम कार्यकर्ते बोललो कारण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना कार्यकर्ता म्हणून प्रत्येक तळागाळातल्या व्यक्तीशी त्यांच्या सुखदु:खाशी एकरुप होण्याचा प्रयत्न केला” असं आनंदराज आंबेडकर म्हणाले.
“या अशा कार्यकर्त्याबरोबर महाराष्ट्रातला प्रचंड मोठा आंबेडकरी समाज जो आतापर्यंत अनेक वर्ष रस्त्यावर लढाई लढत आला. त्या कार्यकर्त्याला आतापर्यंत काही मिळालं नाही. या कार्यकर्त्याला सध्याच्या होणाऱ्या स्थानिक निवडणुकांमध्ये आंबेडकरी कार्यकर्त्याला सत्तेचा लाभ मिळावा, यासाठी आम्ही दोघांनी एकत्र यायचं ठरवलं” असं आनंदराज आंबडेकर म्हणाले.

वंचित – बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांचे लहान बंधू असणारे आनंदराज आंबेडकर यांनी १९९८ मध्ये, प्रकाश आंबेडकर यांच्या राजकारणापासून दूर जात, ‘रिपब्लिकन सेना’ नावाचा राजकीय पक्ष स्थापला असून याचे ते अध्यक्षही आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी हट्टाने अमरावतीमधून निवडणूक लढविण्याचे घोषित केले. खरेतर ती जागा वंचितला चांगली मते मिळवून देणारी जागा म्हणून ओळखली जात असताना, तिथे आनंदराज घुसले. परिणामी तिथे वंचितने आपला उमेदवार न देता, आनंदराज याना पाठिंबा दिला. तरीही त्यांना केवळ १८ हजार मते मिळाली आणि आनंदराज तिथे डिपॉझिट गमावून बसले होते, हा नजीकचा इतिहास, मराठी पत्रकारांना ठाऊक नसल्याने, ते या दोन सेना एकत्र येण्याच्या बातम्या रंगवून , फुगवून देत आहेत.
आणखी दुर्लक्ष न करण्यासारखी गोष्ट म्हणजे, ज्या भीमशक्तीची आज चर्चा सुरु आहे, त्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या तिन्ही नातवंडांना महाराष्ट्रातील रिपब्लिकन चळवळीत कधीच मोठे स्थान मिळाले नव्हते. आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बाबासाहेबांच्या तिन्ही नातवंडांना पराभव पत्करावा लागला होता, ही वस्तुस्थिती आणि त्यामागील कारणमीमांसा का विसरली जाते ?
राज्यात शिवसेना – भाजप युतीचे सरकार आल्यानंतर राज्यातील दलित वर्गात सुप्त असंतोष पसरला होता. राज्यातील सत्ता डोळ्यादेखत गेल्याने अस्वस्थ झालेल्या शरद पवार यांनी तो असंतोष अचूकपणे टिपला. त्याच सुमारास रिपब्लिकन ऐक्याची जोरदार चर्चा सुरु होती. मुख्य म्हणजे सर्वसामान्य दलित मतदारांना उत्तर प्रदेशात कांशीराम – मायावतीने मिळवलेल्या सत्तेमुळे “शासनकर्ती जमात व्हा” हा बाबासाहेबांचा संदेश खुणावत होता. त्यामुळे ‘पॅन्थर’ नामदेव ढसाळांपासून राजा ढाले, ज वि पवार , रामदास आठवले, रा सु गवई, बी सी कांबळे, प्रा जोगेंद्र कवाडे, अर्जुन डांगळे, भाई संगारे, अविनाश महातेकर अशा नेत्यांकडे मोठ्या आशेने पाहत होता. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या एक्याची ताकद ओळखून , १९९६ च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियासोबत काँग्रेसची युती करण्याचा प्रयत्न यशस्वी केला होता. काँग्रेससोबत झालेल्या युतीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला राज्यात लोकसभेच्या चार जागा मिळाल्या. विशेष म्हणजे त्या निवडणुकीत अमरावतीतून रा.सू. गवई पहिल्यांदाच निवडून आले. तसंच या निवडणुकीत जोगेंद्र कवाडे, प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले यांनी देखील बाजी मारली होती. भीमशक्तीचा महाराष्ट्राच्या राजकारणात दिसलेला तो पहिला आणि शेवटचा नेत्रदीपक अविष्कार होता.
त्यानंतर काँग्रेसच्या मतलबी राजकारणात सर्व रिपब्लिकन गट – तट ‘खुदखुशी’ करत ढासळत , कोसळत गेले.
त्याच सुमारास, ज्या मराठवाड्याने नामांतराचा प्रदीर्घ लढा पहिला होता, तिथे हिंदुत्ववादी शिवसेना प्रवेश करती झाली होती. बाबरी मशीद पडल्यानंतर भाजपच्या आक्रमक राजकारणाने वेग घेतला होता. त्यामुळे राज्याच्या राजकारणात जातीच्या जाणिवांना ओलांडून धार्मिक ध्रुवीकरण पुढे आले होते.
खाजगीकरण, जागतिकीकरण आणि उदारीकरणाच्या नव मंत्राने भारावलेल्या समाजाला खरेतर आपल्या पुढे काय वाढून ठेवले आहे, याची फारशी कल्पना नव्हती. आज आपल्याला ए आय किंवा मशीन लर्निंगने आपल्यावर नेमका काय परिणाम होईल, याचा नीट अंदाज लागत नाही. अगदी तशीच स्थिती नव्वदच्या दशकात होती. परिणामी, ‘वाय टु के’ च्या भीतीतच आम्ही एकविसावे शतक गाठले. आणि संगणक, मोबाइल आणि आधुनिक तंत्रज्ञान प्रचंड वेगाने आपले जीवन व्यापून टाकू लागले.
एकविसाव्या शतकाने महाराष्ट्रात जसे आर्थिक बदल घडवले, तसेच वैचारिक बदलही घडत गेले. दलित असण्याच्या, अस्पृश्यतेच्या अमानवीय प्रथेचे चटके सोसलेले लोक एकतर म्हातारे झाले किंवा काळाच्या पडद्याआड गेले. साठोत्तरी साहित्यात स्वतःचा ‘दलित साहित्य’ हा अभिव्यक्तीचा ‘दम’दार प्रवाह निर्माण करणारे साहित्यिक, तोवर दुर्मिळ बनले होते. प्रस्थापित समाजाशी एकरूप होण्याची, खरेतर प्रस्थापित होण्याची एक प्रचंड ओढ सर्वच प्रकारच्या मागास वर्गात उसळून आली आणि कोण्याही रिपब्लिकन नेत्याने हाक देताच, हातातील कामे टाकून जमा होणारा आंबेडकरी समाज, स्वतःच्या, कुटुंबाच्या सुखाचा विचार करू लागला. त्याच सुमारास रिपब्लिकन नेतृत्वाच्या मनमानी कारभाराने त्यांचे राजकीय महत्व कमी होत गेले.
त्यामुळे गेल्या दोन दशकांमध्ये डझनभर गट- तटांमध्ये विभागले गेलेले समस्त रिपब्लिकन पक्ष, विविध पॅन्थर संघटना या केवळ आणि केवळ बड्या राजकीय पक्षांच्या युती किंवा आघाड्यांमधील नाममात्र “घटक पक्ष” बनले. एकटे प्रकाश आंबेडकर मात्र आपला “अकोला पॅटर्न” सांभाळत, काम करत राहिले. घरातील बौद्ध जन पंचायतीचे धार्मिक नेतृत्व त्यांना या कामासाठी पूरक ठरत होते.
२०१९ हे वर्ष वंचित बहुजन आघाडीच्या राजकीय प्रवासातील एक निर्णायक वळण ठरलं. दलित, बहुजन आणि इतर उपेक्षित घटकांचा आवाज बनण्याचा निर्धार घेतलेल्या या नव्या राजकीय शक्तीने आपलं अस्तित्व ठसवण्यासाठी लोकसभा निवडणुकीत एआयएमआयएमसोबत युती करत संपूर्ण महाराष्ट्रात सर्व ४८ जागांवर उमेदवार उभे केले. या लढतीत केवळ संभाजीनगरची एक जागा या आघाडीला मिळाली. इम्तियाज जलील या एकमेव उमेदवाराला जनतेने स्वीकारलं, पण उर्वरित सर्व लढवलेले उमेदवार अपयशी ठरले.

तरीही, केवळ एका विजयाच्या पार्श्वभूमीवरही वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने सुमारे ३७ लाख मते जमा झाली. या मतांमागे होती उपेक्षित समाजाची आशा, एका नवीन पर्यायाची आस, आणि पारंपरिक राजकारणावरील विश्वासाचा उगम. ही आकडेवारी फक्त मतदानाची नव्हे, तर वंचितांचा एक सुस्पष्ट राजकीय घोषणा होती—”आमचंही स्थान आहे.”
मात्र काही महिन्यांतच आलेल्या विधानसभा निवडणुकीत हेच जनमत घटताना दिसलं. २३४ जागांवर उमेदवार उभे करूनही वंचित बहुजन आघाडीला कुठेही यश मिळालं नाही. आणि यावेळी पक्षाचं मताधिक्यही १२ लाखांनी कमी झालं. हे फक्त आकड्यांचं नव्हे, तर जनतेच्या मनातील अपेक्षा आणि वास्तव यामधील संघर्षाचं प्रतिबिंब होतं. पण ही घसरण तिथेच थांबली नाही.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या ६.५ टक्के मतांच्या तुलनेत वंचित – बहुजन आघाडीला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत केवळ दोन टक्के तर, विधानसभा निवडणुकीत वंचित – बहुजन आघाडीला केवळ तीन टक्के मतदान झाले आहे. जर पाच वर्षांपूर्वी मजबूत असलेल्या प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाची आज ही स्थिती आहे. तर, निवडणूक लढविण्याचा फारसा अनुभव नसलेल्या, संघटनेचे विस्तारित जाळे नसलेल्या आनंदराज यांच्या रिपब्लिकन सेनेची राजकीय ताकद किती हे आपण समजू शकतो. आणि आता तर, एकनाथ शिंदे यांच्या सेने सोबत गेल्यामुळे, आनंदराज आणि प्रकाश यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला आहे. तसे प्रकाश आंबेडकर यांनी कालच खास पत्रक प्रसिद्धीस देऊन जाहीर केले आहे. त्यामुळे आजवर एकसंध राहिलेल्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या “राजगृह”ला तडे गेले आहेत.
आजवरचा आंबेडकर कुटुंबीयांचा राजकीय प्रवास पाहिला तर, प्रकाश आंबेडकर यांच्या तुलनेत, आनंदराज आणि भीमराव या दोन्ही भावांकडे फार कमी आंबेडकरी समाज आकृष्ट झालेला दिसतो. कारण प्रकाश आंबेडकर यांच्या राजकारणात सातत्य आहे. केवळ वारसा सांगण्याऐवजी त्यांनी निर्माण केलेल्या “अकोला पॅटर्न” ने राज्यातील ‘सोशल इंजिनिअरिंग’ ला गती दिली, हे त्यांचे विरोधक सुद्धा मान्य करतील. अति आत्मविश्वास असल्याने जलद निर्णय घेण्यात कमी पडल्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्या राजकीय ‘चाली’ चुकत गेल्या… परिणामी, राज्याला बहुजन केंद्रित नेतृत्व देण्याची क्षमता असलेले हे ‘बाळासाहेब’ काही जिल्ह्यांपुरते मर्यादित राहिले… तर त्यांचे दोन्ही भाऊ, कायम त्यांच्या सावलीत राहिले. मग त्यांची विशेष वाढ होण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता.
एक इंदू मिलच्या आंदोलना व्यतिरिक्त आनंदराज यांच्याविषयी सांगण्यासारखे दुसरे काही नाही. एक चांगली परंपरा असलेली शिक्षण संस्था त्यांच्या ताब्यात आहे, बस्स. तिसरे बंधू भीमराव हे बौद्ध जन पंचायतीत सक्रिय असलेले दिसतात. त्यांच्या पक्षाचे नाव आहे, “ग्लोबल रिपब्लिकन पक्ष”. त्या पक्षाच्या नावावर लढणार्‍या
भीमराव यांना लोकसभा निवडणुकीत, पंजाबच्या होशियारपूर मतदारसंघात फक्त १ हजार ४१ मते मिळाली होती. त्याच वेळी इकडे विदर्भात, खरतर वऱ्हाडात प्रकाश आंबेडकर अनुप धोत्रे यांच्याविरोधात जोरदार टक्कर देत तिसऱ्या क्रमांकाची मते घेत पराभूत झाले. रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांना अमरावतीत केवळ १८ हजार मतांवर समाधान मानावे लागले. पण, भीमराव यांनी केवळ एक हजार मते देणारा होशियारपूर हा मतदारसंघ का निवडला असावा, याचे आज आश्चर्य वाटते आणि हो आम्हाला राजकीय भान देणाऱ्या घटनाकार बाबासाहेबांचे तिन्ही नातू एकाच लोकसभा निवडणुकीत, तीन वेगवेगळ्या पक्षाकडून निवडणूक लढवतात आणि पराभूत होतात, याचे दुःखही होते.
तर ही अशी “भीमशक्ती” आणि दात – नखे गमावून बसलेल्या, डरकाळी विसरलेल्या ठाण्याच्या ढाण्या वाघाची “शिवशक्ती” एकत्र येण्याने काय दिवे लागणार ?
उथळ बातम्यांच्या पाण्यात नाचणाऱ्या माझ्या पत्रकार बांधवांना आणि आपल्या नेत्यांच्या पुढे – मागे धावणाऱ्या नवीन कार्यकर्त्यांच्या माहितीसाठी हा लेखन प्रपंच…

महेश म्हात्रे
महाराष्ट्र रिसर्च सेंटर

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *