मुंबई: महाराष्ट्र राज्यातील मंत्रालय, ठाणे आणि नाशिक ही ठिकाणे ‘हनी ट्रॅप’चे केंद्र बनली असल्याचा खळबळजनक दावा काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य नाना पटोले यांनी गुरुवारी विधानसभेत केला. त्यांनी आपल्या दाव्याच्या पुष्टीसाठी हनी ट्रॅपचे चित्रीकरण असलेला पेनड्राइव्ह सभागृहात सादर केला. या गंभीर प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या प्रशासनाची विश्वासार्हता डागाळली जात आहे असे पटोले म्हणाले. सरकार यावर साधे निवेदन द्यायलाही तयार नसल्याबद्दल त्यांनी धक्का व्यक्त केला. राज्यातील ज्वलंत प्रश्नांवर सरकारची उदासीनता चिंताजनक असून, या गंभीर सुरक्षाविषयक प्रकरणावर मौन आणि रेशनमधील भेसळीवर कारवाईचा अभाव यामुळे राज्यात नेमके काय चालले आहे, असा प्रश्न निर्माण होत असल्याचे पटोले यांनी नमूद केले. त्यांनी सरकारला हे प्रश्न गांभीर्याने घेण्याचे आवाहन केले.
‘हनी ट्रॅप’ची चौकशी सुरू आहे का? अंबादास दानवे यांचा सरकारला सवाल
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या हनी ट्रॅपमुळे सरकारच्या कामकाजातील गोपनीयता आणि महत्त्वाच्या फाईल्स बाहेर गेल्याची चर्चा असल्याने राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे योग्य नसल्याचे म्हटले. यातून मोठ्या प्रमाणावर ब्लॅकमेलिंगचे प्रकार होत असल्याचा दावाही त्यांनी केला. त्यामुळे ‘हनी ट्रॅप’ची खरोखरच चौकशी सुरू आहे का? असा थेट सवाल दानवे यांनी सरकारला केला. दानवे यांनी या हनी ट्रॅप प्रकरणावर चर्चा करण्यासाठी नियम २९१ अन्वये सभागृहात प्रस्ताव मांडला होता, परंतु तो सभापतींनी नाकारला. यावर बोलताना दानवे म्हणाले की, राज्यातील राजकीय नेते व काही वरिष्ठ स्तरावरील अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची चर्चा आहे. पहलगाम हल्ल्यावेळी अशा प्रकारे ट्रॅप करणारे लोक केंद्र सरकारने पकडले होते. अशा हनी ट्रॅपमुळे राज्याची प्रशासकीय स्तरावरील गुप्त माहिती व महत्त्वाच्या फाईल्स बाहेर गेल्याची माहिती आहे. राज्यातील गोपनीय दस्तऐवज थेट असामाजिक तत्वांच्या हाती पोहोचत असल्याचा दावा दानवे यांनी केला. त्यांनी जोर दिला की, शासकीय कामकाजात याचा दुरुपयोग केला जाऊ शकतो. राज्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा विषय असल्याने सभापतींनी दालनात हा विषय मंजूर केला नसला तरी सरकारने यावर भूमिका व्यक्त करावी, अशी मागणी दानवे यांनी केली.
Leave a Reply