मुंबई: विधान परिषदेच्या कामकाजादरम्यान कृषीमंत्री माणिकराव कोकाटे रमी खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची गंभीर दखल घेत कोकाटे यांची कानउघडणी केली आहे. दुसरीकडे, विरोधकांनी हे प्रकरण लावून धरत कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कोकाटे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आव्हाड यांनी कोकाटे यांचे दोन व्हिडिओ ‘एक्स’वर (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट करत, “आता मी दोन व्हिडिओ देतोय. दोन्ही व्हिडिओ व्यवस्थित बघा. कुठला पत्ता कुठे आणि कसा हलवला आहे, हे दिसेल. कोकाटे हे ऑनलाइन जुगाराचे पत्ते बोटाने सरकवत आहेत,” असे म्हटले आहे. आव्हाड यांनी, “विधिमंडळाचे कामकाज सुरू असताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे जंगली रमी खेळत होते याचे आणखी किती पुरावे हवेत ते सांगा, मागाल तेवढे पुरावे देतो,” असे आव्हान दिले आहे.
या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपली नाराजी व्यक्त केली आहे. कोकाटे यांनी “मी रमी खेळत नव्हतो, अचानक जाहिरात पॉपअप झाली,” असे स्पष्टीकरण दिले असले तरी, फडणवीस यांनी “जे घडले ते भूषणावह नाही,” या शब्दात त्यांना सुनावले आहे. माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, “विधिमंडळात जेव्हा चर्चा चालते तेव्हा आपले कामकाज नसले तरीही आपण गांभीर्याने बसणे गरजेचे आहे. एखाद्या वेळेस तुम्ही कागदपत्रे वाचता; पण रमी खेळतानाचा व्हिडिओ हे निश्चितच योग्य नाही, हे अतिशय चुकीचे आहे.”
दरम्यान, कृषीमंत्री कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबतचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार असल्याची माहिती अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सोलापुरात दिली आहे. या प्रकरणामुळे सरकारची प्रतिमा मलिन झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून, विरोधकांनी कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी सरकारवर दबाव वाढवला आहे. पुढील काळात या प्रकरणात आणखी काय घडामोडी होतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Leave a Reply