मुंबई : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी “सरकार भिकारी आहे” असे वादग्रस्त विधान केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या वक्तव्यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. कोकाटे यांची तात्काळ हकालपट्टी करण्याची मागणी करत, मुख्यमंत्र्यांमध्ये ती हिंमत नाही का, असा सवाल सपकाळ यांनी उपस्थित केला आहे.
कोकाटेंच्या वक्तव्यावरून राजकीय गदारोळ
हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राला मोठी राजकीय परंपरा आणि संस्कृती लाभली आहे, परंतु देवेंद्र फडणवीस यांचे सरकार ती धुळीस मिळवत आहे. कोकाटे यांनी “सरकार भिकारी आहे” असे विधान करून असंवेदनशीलतेचा कळस गाठला आहे. अशा मंत्र्याला एक मिनिटही पदावर ठेवू नये, असे सपकाळ यांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना पाठीशी घालण्यामागे काहीतरी मजबुरी असावी, असा आरोपही त्यांनी केला.
शेतकऱ्यांच्या दुर्दशेवर कोकाटेंची बेफिकिरी?
सपकाळ यांनी कृषीमंत्री कोकाटे यांच्या पूर्वीच्या वादग्रस्त वर्तणुकीचाही उल्लेख केला. विधानसभेत ऑनलाईन रमी खेळतानाचे त्यांचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. आज शेतकरी अडचणीत असताना, त्यांना अवकाळी पावसाची नुकसानभरपाई मिळालेली नाही, शेतमालाला भाव मिळत नाही, कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण झालेले नाही आणि काही भागांमध्ये दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. अशा स्थितीत कोकाटे शेतकऱ्यांच्या समस्यांकडे गांभीर्याने पाहत नाहीत, असे सपकाळ यांनी म्हटले.”शेतकऱ्याला भिकारी म्हणालो नाही, तर ‘सरकारच भिकारी आहे’, राजीनामा द्यायला मी काय विनयभंग केला आहे का?” अशी कोकाटे यांची विधाने निर्लज्जपणाचा कळस असून, ते मुख्यमंत्र्यांनाही जुमानत नाहीत हे स्पष्ट होते, असे सपकाळ यांनी नमूद केले.
महाराष्ट्राच्या प्रतिमेला धोका
सातत्याने वादग्रस्त विधाने करून माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाची प्रतिमा मलिन केली आहे, असे सपकाळ म्हणाले. महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण चिंताजनक असताना, अशा व्यक्ती मंत्रिपदावर राहणे राज्याच्या आणि शेतकऱ्यांच्या हिताचे नाही. कोकाटेंना तात्काळ पदावरून दूर करून त्यांना घरचा रस्ता दाखवावा, अशी मागणी सपकाळ यांनी केली. अशा व्यक्तींमुळे महाराष्ट्राच्या प्रतिमेला तडा जातो, याची तरी काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी मुख्यमंत्र्यांना केले.
Leave a Reply