महाराष्ट्राचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. “पीक विम्यासाठी सरकार शेतकऱ्यांकडून एक रुपया घेते, याचा अर्थ सरकार भिकारी आहे, शेतकरी नाही,” असे वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे. या विधानामुळे विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली असून, त्यांच्या राजीनाम्याची मागणीही जोर धरू लागली आहे.
नेमके काय घडले?
गेल्या काही दिवसांपूर्वी विधिमंडळात मोबाइलवर रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने कोकाटे अडचणीत आले होते. आता त्यांनी केलेल्या ताज्या विधानामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत. त्यांच्या या विधानावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली येथे नाराजी व्यक्त केली. “कोकाटे काय बोलले हे मी पाहिले नाही, पण मंत्र्यांचे असे वक्तव्य दुर्दैवी आहे,” असे फडणवीस म्हणाले. दरवर्षी ५ हजार कोटी याप्रमाणे येत्या पाच वर्षांत २५ हजार कोटींची गुंतवणूक शेतीत करत असताना, मंत्र्याने असे वक्तव्य करणे चुकीचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
विरोधकांकडून तीव्र प्रतिक्रिया
शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कोकाटे यांच्या तातडीने राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यांच्या मते, असे विधान शेतकऱ्यांचा अपमान करणारे आहे.
कोकाटे यांचा खुलासा
या वादावर स्पष्टीकरण देताना माणिकराव कोकाटे म्हणाले की, “शेतकऱ्यांना मी यापूर्वी कधीही भिकारी म्हणालो नव्हतो. तेव्हाही माझ्या शब्दाचा विपर्यास केला गेला.” ते पुढे म्हणाले, “शेतकऱ्यांकडून एक रुपया शासन घेते, म्हणजे भिकारी शासन आहे, शेतकरी नाही.” पीक नसल्याने शेतातील ढेकळांचे पंचनामे करण्याच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केले. “जिथे पीकच नाही तेथे शेतातील ढेकळांचे पंचनामे करायचे का? ही बाब खरीच असून ‘ढेकळं’ म्हणजे काय हे विरोधकांनी समजून घ्यावे,” असेही कोकाटे म्हणाले. कोकाटे यांच्या या विधानामुळे राज्यातील राजकारण तापले असून, यावर आता पुढे काय घडामोडी होतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Leave a Reply