IAS अधिकारी पूजा खेडकर यांचे नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र रद्द, ओबीसी प्रमाणपत्र कायम

नाशिक: वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्राला नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी चुकीचे ठरवले आहे. त्यामुळे खेडकर यांनी मंत्रालयात अपील दाखल केले आहे. मात्र, त्यांचे ओबीसी प्रमाणपत्र कायम ठेवण्यात आले आहे. विभागीय आयुक्तांनी दिलेल्या निकालानुसार, पूजा खेडकर यांचे वडील वर्ग एकचे अधिकारी असले तरी, त्यांनी आपली मूळ सेवा बदलून घेतली होती. तसेच, आई-वडिलांच्या घटस्फोटानंतर आपले उत्पन्न घटले असल्याचा त्यांचा मुद्दाही वैध ठरला नाही.

गेल्या वर्षभरापासून पूजा खेडकर यांची वादग्रस्त कारकीर्द चर्चेत आहे. त्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्रावरूनही वाद निर्माण झाला होता आणि त्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच संदर्भात त्यांचे नॉन-क्रिमीलेयर आणि ओबीसी प्रमाणपत्र देखील संशयाच्या भोवऱ्यात होते. या प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडे सोपवण्यात आली होती. चौकशीदरम्यान, गेडाम यांनी खेडकर यांच्याकडे दोन्ही प्रमाणपत्रांच्या पुष्ट्यर्थ अनेक कागदपत्रे मागवली होती. मात्र, नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्रासाठी त्या पुरेशी कागदपत्रे देऊ शकल्या नाहीत.

तसेच, पूजा खेडकर यांनी वेगवेगळ्या ठिकाणी दिलेल्या शपथपत्रांमधील माहितीतही तफावत आढळली. अपूर्ण माहिती आणि दिलेल्या माहितीतील विसंगती या आधारे विभागीय आयुक्तांनी त्यांचे नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र चुकीचे ठरवले. दुसरीकडे, त्यांचे वंजारी जात म्हणजेच ओबीसी प्रमाणपत्र मात्र कायम ठेवण्यात आले आहे. विभागीय आयुक्तांच्या या निकालाविरुद्ध खेडकर यांनी मंत्रालयात अपील केले आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *