छत्रपती संभाजीनगर: व्हाट्सॲपवर येणारे धोकादायक मेसेजचा ट्रेंड वाढत चालला असून, शासकीय योजना किंवा आरटीओ चालानच्या नावाखाली पाठविल्या जाणाऱ्या एपीके फाईल्समुळे मोबाईल हॅक होण्याचे प्रकार वाढले आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील एका वैद्यकीय व्यावसायिकाला ‘आरटीओ चालान’ नावाची एपीके फाईल इन्स्टॉल करताच क्षणात त्यांचा मोबाईल हॅक झाला. काही तासांतच सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या मोबाईल बँकिंग ॲपमधून ९ लाख रुपये काढून घेतले. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय घडले?
शेख वसीमोद्दीन या वैद्यकीय व्यावसायिकाला १५ जुलै रोजी ‘रिव्हास हेल्थ केअर’ या व्हाट्सॲप ग्रुपवर ‘आरटीओ चालान ५०० रुपये’ नावाचा एक एपीके फॉरमॅटमधील मेसेज आला. वसीमोद्दीन यांनी त्यावर क्लिक करताच त्यांचा फोन हॅक झाला. लगेचच अनेक ओटीपी येण्यास सुरुवात झाली आणि त्यांनी नेट बँकिंगद्वारे पैसे ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या बँक खात्याचे सर्व पासवर्ड बदलून येस बँकेतून २ लाख रुपये वळते केले होते. वसीमोद्दीन यांनी बँकेत धाव घेतली तोपर्यंत दोन टप्प्यात ७ लाख रुपये काढून घेण्यात आले होते. याच दरम्यान, सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या एचडीएफसी बँक खात्यातूनही ३ लाख ४४ हजार रुपये काढून घेतले. एकूण १ तासां₹च्या आत त्यांना ९ लाखाचा फटका बसला.
एपीके म्हणजे काय?
अँड्रॉइड पॅकेज किट (Apk) म्हणजे अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीमसाठी ॲप्लिकेशन्स इन्स्टॉल करण्यासाठी वापरली जाणारी फाईल. प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवरील ॲप्स सुरक्षित असतात, परंतु थेट लिंक, टेलिग्राम किंवा व्हाट्सॲपद्वारे येणाऱ्या एपीके फाईल्स धोकादायक असतात.
हा स्कॅम कसा होतो?
सायबर गुन्हेगार आर्थिक शासकीय योजना किंवा ‘आरटीओ चालान’च्या नावाखाली एपीके फाईल्स पाठवतात. या फाईल्स इन्स्टॉल करताच, गुन्हेगारांना तुमच्या मोबाईलचा ताबा मिळतो.
नेमके काय घडते?
एपीके ॲपवर क्लिक करताच, एक हिडन ॲप मोबाईलमध्ये दिसत नसले तरी बॅकग्राउंडला इन्स्टॉल होते. यामुळे तुम्ही मोबाईलवर जे काही करता, ते सायबर गुन्हेगारांना दिसते. बँक ॲप उघडताच, त्यांना तात्काळ तुमचा ताबा मिळतो. तुमचे सर्व मेसेज आणि कॉल एका विशिष्ट नंबरला ऑटो-फॉरवर्ड होतात.
काय काळजी घ्यावी?
* व्हाट्सॲपचे ऑटो डाउनलोड मोड कायम बंद ठेवा.
* अनओळखी ॲप इन्स्टॉल झाल्यास, लगेचच मोबाईल फ्लाइट मोडवर टाकून फॅक्टरी रिसेट करा.
* अशा प्रकारचा कोणताही प्रकार घडल्यास तात्काळ ११३० या क्रमांकावर तक्रार नोंदवा.
Leave a Reply