मुंबई: गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्रींच्या नावाने चालवल्या जाणाऱ्या ‘सातवी डान्सबार’वरील धाडीसंदर्भात उद्धवसेनेचे नेते अनिल परब यांनी विधिमंडळात केलेल्या आरोपांना पुष्टी देणारे पुरावे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केले आहेत. परब यांनी मंगळवारी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हे पुरावे सोपवले, ज्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. परब यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे की, या पुराव्यांची सखोल तपासणी करून योगेश कदम यांचा राजीनामा घेण्यात यावा. माध्यमांशी बोलताना परब म्हणाले की, “मुख्यमंत्र्यांनी एकतर या पुराव्यांवर कारवाई करावी, अन्यथा हे पुरावे खोटे असल्याचे स्पष्ट करावे. जर पुरावे खरे असूनही कारवाई झाली नाही, तर आम्ही असे समजू की मुख्यमंत्र्यांकडूनच डान्सबारना अभय दिले जात आहे.” मुख्यमंत्र्यांनी हे पुरावे तपासून निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याचेही परब यांनी सांगितले.
दरम्यान, या आरोपांवर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “विधिमंडळाचे नियम पायदळी तुडवून परब यांनी माझ्यावर आरोप केले आहेत. ते राज्यपालांकडे गेले होते आणि कदाचित राष्ट्रपतींकडेही जातील,” असे कदम म्हणाले. मात्र, या खोट्या आरोपांमुळे आपले लक्ष विचलित होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. “राज्यमंत्री म्हणून माझ्याकडे जी खाती आहेत, त्यांच्या कामावर माझे पूर्ण लक्ष आहे. मी माझी बाजू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडेन,” असे योगेश कदम यांनी नमूद केले.या प्रकरणामुळे राज्य मंत्रिमंडळात तणाव निर्माण होण्याची शक्यता असून, मुख्यमंत्र्यांच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply