मुंबई: कायदा आणि सुव्यवस्थेसाठी स्थापन करण्यात आलेल्या ट्रोम्बे पोलिसांच्या महिला कमिटीच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये हॅकरने प्रवेश करत एक बनावट फाईल शेअर केली. या फाईलवर एका क्लिकमुळे पोलिसांचे साडेसात लाख रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सायबर गुन्हेगारांनी पोलिसांच्या नावाने कर्ज काढून ही रक्कम वेगवेगळ्या खात्यांमध्ये वळवली असल्याचे समोर आले आहे. ट्रोम्बे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सायबर पोलिसांकडे सोपवला आहे. पोलिसांनी दिलेल्या तक्रारीनुसार, नवी मुंबई येथील एक पोलीस शिपाई, जे सप्टेंबर २०२४ पासून ट्रोम्बे पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत, ते या प्रकरणातील पीडित आहेत. ट्रोम्बे पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि त्यासंबंधी महत्त्वपूर्ण सूचना देण्यासाठी पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी आणि परिसरातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या ‘महिला कमिटी ट्रोम्बे’ नावाचा एक व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्यात आला आहे. २२ जुलै रोजी दुपारी या ग्रुपमध्ये एका आरटीओ चलनाची बनावट फाईल शेअर करण्यात आली.
पीडित तक्रारदारांनी फाईलमध्ये काय आहे हे पाहण्यासाठी त्यावर क्लिक केले. मात्र, फाईल उघडली नाही. पण, त्याच वेळी सायबर चोरांना त्यांच्या मोबाईलचा ॲक्सेस मिळाला. काही वेळातच त्यांच्या मोबाईलवर आर्थिक व्यवहाराचे संदेश येऊ लागले. सर्वप्रथम त्यांच्या बँक खात्यातून सायबर चोरांनी सहा लाखांचा संदेश पाठवला. त्यानंतर अवघ्या १२ मिनिटांत २ लाख ९९ हजार रुपये आणि पुढील मिनिटात २ लाख ५५ हजार रुपये काढून घेतल्याचे समोर आले, हे पैसे कर्जाच्या स्वरूपात काढले गेले होते.
सायबर फसवणूक झाल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी तत्काळ सायबर क्राईम हेल्पलाइनवर संपर्क साधून तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे तक्रार नोंदवली गेली नाही, त्यामुळे त्यांनी पुन्हा तक्रार नोंदवली.
फसवणूक कशी झाली?
सायबर गुन्हेगारांनी एका बनावट मोबाईल हॅकिंगची लिंक पाठवली होती. या लिंकवर क्लिक करताच, समोरच्या व्यक्तीचा फोन हॅक होतो आणि बँक खाते व पासवर्डची माहिती मिळते. तसेच, वन-टाइम पासवर्ड (OTP) मिळवून लाखो रुपये काढले जातात.
फाइल पाठवणाऱ्याचा मोबाईलही हॅक
ट्रोम्बे पोलिसांनी केलेल्या तपासानुसार, अज्ञात मोबाईल नंबर वापरून फसवणूक करण्यात आली आहे. या फसवणुकीत एका पोलीस अधिकाऱ्याच्या नावाचा वापर करण्यात आला होता. व्हॉट्सॲपवर पाठवलेल्या लिंकद्वारे फोन हॅक करण्यात आला होता. हे प्रकरण सायबर क्राईम पथकाकडे वर्ग करण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.
Leave a Reply