मुंबई: पर्यावरणाची काळजी घेत गणेशोत्सव साजरे करण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिस (पीओपी) पासून बनवलेल्या मूर्तींच्या पुनर्वापरासाठी सरकारने विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. पीओपीच्या पुनर्वापराची प्रक्रिया आणि त्याचे धोरण निश्चित करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षतेखाली ८ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीला सहा महिन्यांच्या आत आपला अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पीओपीच्या मूर्ती आणि पर्यावरणाचा धोका
पीओपीचा वापर पर्यावरणासाठी हानिकारक आहे. पीओपीच्या मूर्ती पाण्यात सहज विरघळत नाहीत, ज्यामुळे नदी, तलाव आणि समुद्रात विसर्जन केल्यानंतर गंभीर प्रदूषण होते. पीओपीमुळे पाण्यातील ऑक्सिजनची पातळी घटते आणि जलचरांसाठी धोका निर्माण होतो. या समस्येमुळे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने आणि न्यायालयाने पीओपीच्या मूर्तींवर बंदी घालण्याचे निर्देश दिले होते. मात्र, सरकारने अद्याप पूर्णपणे बंदी घातलेली नाही, त्यामुळे या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.
समितीची उद्दिष्ट्ये आणि रचना
पीओपीच्या पुनर्वापराच्या उपायांचा अभ्यास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या या समितीची रचना खालीलप्रमाणे आहे:
* अध्यक्ष: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव
* सदस्य: आयटीडीसी प्रतिनिधी, आरआयडीटी, पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे प्रतिनिधी, गोवा विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रतिनिधी, सीएसआयआर चे प्रतिनिधी, आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळातील प्रादेशिक अधिकारी.
* सदस्य सचिव: महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाचे सहसंचालक (जल).
समितीची प्रमुख कामे
ही समिती खालील महत्त्वपूर्ण कामे करणार आहे:
* पीओपीच्या पुनर्वापरासाठी प्रभावी आणि सुरक्षित धोरण तयार करणे.
* पर्यावरणपूरक आणि कमी खर्चाच्या विल्हेवाटीच्या पद्धतींचा अभ्यास करणे.
* पीओपीचा वापर करणाऱ्या उद्योगांसाठी प्रमाणके ठरवणे.
* जैविक विघटन पर्यायांचे संशोधन आणि विकास करणे.
* सध्याच्या लँड डंपिंगच्या पर्यायांचाही विचार करणे.
* विसर्जित मूर्तींच्या व्यवस्थापनासाठी उपाययोजना सुचवणे.
या समितीचा उद्देश पीओपीच्या मूर्तींमुळे होणारे प्रदूषण कमी करणे, त्यांच्या विल्हेवाटीचे योग्य व्यवस्थापन करणे आणि या संदर्भात राज्य सरकारला शिफारशी करणे हा आहे. या समितीच्या कामाचा खर्च महाराष्ट्र प्रदूषण मंडळाकडून उचलला जाईल. यामुळे भविष्यात गणेशोत्सव आणि इतर सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे करण्यासाठी मदत होईल.
Leave a Reply