मुंबई : ‘महादेवी’ हत्तीण प्रकरणात सरकारने कोणताही थेट आदेश दिलेला नाही, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती येथे पत्रकारांशी बोलताना दिली. त्यांनी सांगितले की, नांदणी परिसरातील लोकांच्या भावना लक्षात घेऊन, या प्रकरणी मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर ‘महादेवी’ प्रकरणावर ही बैठक होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री म्हणाले, “मूळात हा शासनाचा निर्णय नाही. प्राण्यांविषयी काम करणारे कार्यकर्ते आणि संबंधित संस्थांनी हे प्रकरण सुरू केले.” त्यांनी पुढे सांगितले की, उच्च न्यायालयाने या प्रकरणात एका उच्चाधिकारी समितीची नेमणूक केली होती. त्या समितीने हत्तीणीला अभयारण्यात सोडण्याची सूचना केली. उच्च न्यायालयाच्या या आदेशाला सर्वोच्च न्यायालयानेही कायम केले. महाराष्ट्रात असे अभयारण्य नसल्याने ‘वनतारा’ मध्ये हत्तीणीला ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार हत्तीणीला तिकडे हलवण्यात आले. केवळ न्यायालयीन कामकाजासाठी वनविभागाचा आवश्यक अहवाल तेव्हा देण्यात आला होता. यामध्ये शासनाची कोणतीही थेट भूमिका नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, नांदणी (ता. शिरोळ) येथील ‘महादेवी’ उर्फ ‘माधवी’ हत्तीणीला परत आणण्याची मागणी करत नांदणी ते कोल्हापूर असा मूळ मोर्चा काढण्यात आला होता. ‘एक रविवार महादेवीसाठी’ असा नारा देत लहान मुले, वृद्ध, तरुण अशा हजारोंच्या संख्येने लोक या मोर्चात सहभागी झाले होते. ‘महादेवीला परत आणून गप्प बसू, असा इशारा देत हा मोर्चा कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. ‘महादेवी’ हत्तीणीला गुजरात येथील ‘वनतारा’ येथे नेल्यानंतर शिरोळ तालुक्यातून याविरोधात मोठा उठाव सुरू झाला होता. पहाटे ५:३० वाजता नांदणीतून माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाला सुरुवात झाली आणि साधारणतः दुपारी ३:३० वाजता मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. नांदणी परिसरातील लोकांच्या भावना ‘महादेवी’ हत्तीणीशी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणात लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे.
Leave a Reply