नवी दिल्ली: लग्नाचं आमिष दाखवून एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने राजस्थान उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिलं आहे. नोकरीसाठी परदेशात जायचं असल्यास, पत्नीला भारतातच ठेवण्याच्या राजस्थान उच्च न्यायालयाच्या अटीला त्याने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. या प्रकरणाची सुनावणी ८ ऑगस्ट रोजी होणार आहे.
काय आहे प्रकरण?
सॉफ्टवेअर इंजिनिअरवर भुवनेश्वर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. त्याने लग्नाचं आश्वासन देऊन तक्रारदार महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवले, असा आरोप त्याच्यावर आहे. अटकेची शक्यता असल्यामुळे त्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, तो मंजूर करण्यात आला आहे. याचिकाकर्त्याला परदेशात जाण्याची परवानगी उच्च न्यायालयाने दिली, पण त्याची पत्नी भारतातच राहिली पाहिजे, अशी अट घालण्यात आली. पत्नी भारतात राहणार असल्याने, आरोपी परदेशात जाऊनही पळून जाणार नाही, असे न्यायालयाचे मत होते.
उच्च न्यायालयाच्या अटीला आव्हान
उच्च न्यायालयाच्या या अटीला आव्हान देत इंजिनिअरने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याने दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, उच्च न्यायालयाचा हा आदेश नियमांचं उल्लंघन करणारा आहे. पत्नीला तिची बाजू मांडण्याची संधी न देता किंवा ती या प्रकरणाचा भाग नसतानाही, तिला भारतात थांबण्याचे निर्देश देणे हे चुकीचे आहे.
याचिकाकर्त्यानुसार, उच्च न्यायालयाचा हा निर्णय ‘चुकीचा’ आहे आणि संविधानाच्या कलम २१ अंतर्गत मिळालेल्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करतो. त्याने असंही म्हटलं आहे की, तो फक्त ठरावीक कालावधीसाठी परदेशात जात आहे. कोर्टाच्या निर्देशानुसार, तो कधीही सुनावणीसाठी हजर राहण्याची शपथ घ्यायला तयार आहे. त्यामुळे त्याच्या पळून जाण्याचा किंवा खटल्याला विलंब लावण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. याचिकेत नमूद केल्याप्रमाणे, तो भारतीय नागरिक आहे आणि अमेरिकेच्या नियमांनुसार तिथे राहणार आहे. नोकरीसाठी मिळणाऱ्या उत्पन्नावरच तो आपला उदरनिर्वाह करणार असल्याने त्याच्या पळून जाण्याची शक्यता नाही.
Leave a Reply