मुंबई : नांदणी मठातील (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) ‘माधुरी’ हत्तीणीला पुन्हा मठात आणण्यासाठी राज्य सरकार सुप्रीम कोर्टात जाणार आहे. ही जनभावना लक्षात घेऊन नांदणी मठाने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी. राज्य शासनानेही स्वतंत्र पुनर्विचार याचिका दाखल करून सर्वोच्च न्यायालयात हत्तीणीला परत देण्यासंदर्भात भूमिका माडेल, असे सांगून याप्रकरणी राज्य शासन पूर्णपणे मठाच्या पाठीशी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात माधुरी उर्फ महादेवीच्या प्रश्नासंदर्भात बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी शासनाची भूमिका स्पष्ट केली.
या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, वनमंत्री गणेश नाईक, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री गिरीश महाजन, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री प्रकाश आबिटकर आणि मठाचे प्रतिनिधी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “हत्तीणीची काळजी घेण्यासाठी एक पथक तयार करून राज्य शासन सर्व मदत करेल. आवश्यक असेल तर रेस्क्यू सेंटरसारखी व्यवस्थाही करू. या बाबी तपासण्यासाठी न्यायालयीन समिती नेमण्याची विनंती करू.” या निर्णयामुळे नांदणी मठातील हत्तीणीच्या परत येण्याची आशा पुन्हा पल्लवित झाली आहे. ही हत्तीण गेली काही वर्षे एका वादामुळे मठापासून दूर होती. यावर तोडगा काढण्यासाठी सरकार आता पुढाकार घेत आहे. या प्रकरणी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट झाल्यामुळे मठाचे प्रतिनिधी आणि परिसरातील जनतेमध्ये समाधानाचे वातावरण आहे. आता सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाल्यानंतर या प्रकरणाची पुढील वाटचाल कशी होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Leave a Reply