नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री कौशल विकास योजना’ (पीएमकेव्हीवाय) अंतर्गत देशभरात प्रशिक्षण घेतलेल्या तरुणांना रोजगार मिळण्याचे प्रमाण खूपच कमी असल्याचे एका आकडेवारीतून समोर आले आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती देखील याला अपवाद नाही. कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर असूनही, रोजगार देण्यात मात्र ११ व्या स्थानावर आहे.
काय आहे आकडेवारी?
२०१५ पासून देशात ‘पीएमकेव्हीवाय’ अंतर्गत एकूण १.६ कोटींहून अधिक तरुणांना विविध कामांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. यापैकी केवळ १४.३ लाख जणांना नोकरी मिळाली आहे. म्हणजेच, प्रशिक्षण घेतलेल्यांपैकी ११ टक्क्यांपेक्षाही कमी तरुणांना रोजगार मिळाला आहे.
महाराष्ट्रातील स्थिती
* कौशल्य प्रशिक्षण देण्यात महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक लागतो.
* २०१५-१६ ते ३० जून २०२५ या कालावधीत महाराष्ट्रात १३ लाख ३१ हजार ३८१ तरुणांनी प्रशिक्षण घेतले.
* यापैकी केवळ ८० हजार ९५० तरुणांनाच नोकरी मिळाली.
* रोजगार मिळण्याच्या बाबतीत महाराष्ट्र राष्ट्रीय क्रमवारीत ११ व्या स्थानावर आहे.
ही आकडेवारी केंद्र सरकारने लोकसभेत लेखी उत्तराद्वारे सादर केली आहे. कौशल्य विकासमंत्री जयंत चौधरी यांनी ही माहिती दिली आहे. या आकडेवारीवरून प्रशिक्षण आणि रोजगार यांच्यातील मोठी तफावत स्पष्ट दिसून येते, जी देशातील बेरोजगारीच्या चिंतेत भर घालणारी आहे.
Leave a Reply