बीड: मुलांच्या लग्नासाठी मुली पाहात असलेल्या गेवराई येथील चार महिलांची एका दाम्पत्याने तब्बल अडीच लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्न जुळवतो असे सांगून हे दाम्पत्य तब्बल महिनाभर पाहुण्यासारखे राहिले आणि पैशांची जुळवाजुळव होताच पोबारा केला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच चारही महिलांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेत आपली कैफियत मांडली. याबाबत अधिक माहिती अशी की, गेवराई येथे मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या चार महिलांच्या मुलांची लग्ने ठरवायची होती. गेल्या वर्षभरापासून त्या मुलांसाठी मुली पाहात होत्या. जून महिन्यात एका ओळखीच्या माध्यमातून धाराशिव येथील एक दाम्पत्य त्यांच्या संपर्कात आले. ‘आम्ही २५ लग्न जुळवली आहेत. तुमच्या मुलांसाठीही चांगल्या मुली आहेत,’ असे आमिष या दाम्पत्याने दाखवले. यातील एका महिलेच्या घरी त्यांनी महिनाभर पाहुण्यासारखा मुक्काम केला.
लग्न जमणार या आशेने महिलांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. या दाम्पत्याने आधी एका महिलेकडून एक लाख रुपये घेतले. त्यानंतर शहरातील आणखी तीन महिलांनाही असेच आमिष दाखवून प्रत्येकी ५० हजार रुपये घेतले. पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी एका महिलेने गळ्यातील मंगळसूत्र गहाण ठेवले, तर दुसऱ्या महिलेने बचत गटातून कर्ज घेतले. लग्न ठरण्याच्या आनंदात महिलांनी दाम्पत्याला नवीन कपडे, साड्या आणि हातवर दक्षिणाही दिली होती. हे दाम्पत्य २५ जुलैपासून अचानक बेपत्ता झाले. त्यांचे मोबाइल बंद असल्याने महिलांना संशय आला. त्यांनी दिलेल्या धाराशिवमधील पत्त्यावर जाऊन पाहणी केली असता तो पत्ताही खोटा असल्याचे आढळून आले. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या सर्व महिलांनी बुधवार (६ ऑगस्ट) रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेऊन आपली व्यथा मांडली. लग्नाआधीच्या खेळखंडोबाची बीडमधील ही आणखी एक नवी कहाणी समोर आली असून, या दाम्पत्याचा शोध सुरू आहे.
Leave a Reply