रागाच्या भरात गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांना अश्रू अनावर

बीड: शिक्षणाचा कंटाळा आणि घरच्यांच्या तगाद्याला कंटाळून, २०१७ साली रागाच्या भरात घर सोडून गेलेला मुलगा तब्बल आठ वर्षांनंतर परतल्याने आई-वडिलांच्या डोळ्यांतून आनंदाश्रूंचा महापूर वाहिला. पोलिसांनी या मुलाला शोधून काढून ‘सरप्राईज गिफ्ट’ म्हणून त्याच्या आई-वडिलांसमोर आणले आणि ‘फिल्मी स्टाईल’ भेटीने सर्वांनाच भावूक केले. राजू काळेसाहेब माळी (वय २४, रा. खडकूट, ता. वडवणी) असे या मुलाचे नाव आहे. २०१७ मध्ये तो शिक्षणासाठी बाहेरगावी गेला होता, मात्र तिथे त्याला शिक्षणाचा कंटाळा आला आणि घरच्यांच्या सततच्या बोलण्यामुळे तो रागाच्या भरात घर सोडून निघून गेला. आई-वडिलांनी खूप शोध घेतला, पण तो सापडला नाही. अखेरीस, २०१९ मध्ये पिंपळनेर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु, त्यावेळी पोलिसांना काही खास मदत मिळू शकली नाही.

दोन दिवसांपूर्वी राजू पुण्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस अधीक्षक सुनील नंदनशीत यांनी तात्काळ अपर अधीक्षक सचिन डिंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाला त्याला शोधून आणण्याचे आदेश दिले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत राजूचा शोध घेतला आणि त्याला बीडला आणले. पोलीस ठाण्यात राजूच्या आई-वडिलांना आणि आजी-आजोबांना तपासणीच्या कामात मदत हवी म्हणून बोलावण्यात आले होते. त्यावेळी उपनिरीक्षक श्रीराम खटावकर अचानक राजू सोबत पोलीस ठाण्यात आले. सर्वांसमोर अचानक राजू उभा राहिल्याने त्याच्या आई-वडिलांना सुखद धक्का बसला. ओळख पटताच राजूने आई-वडिलांना मिठी मारली आणि खूप रडू लागला. या भावूक दृश्याने पोलीस अधिकाऱ्यांचेही डोळे पाणावले. २०१७ साली घर सोडल्यानंतर राजू पुण्यात गेला होता आणि तिथे त्याने सुरक्षा रक्षकाची नोकरी धरली. त्यानंतर तो काहीतरी शिकण्याच्या हेतूने गुजरातला गेला. आठवड्यापूर्वीच तो पुन्हा पुण्यात परतला होता. पोलिसांनी त्याच्यापर्यंत पोहोचून त्याला शोधले आणि कुटुंबियांसोबत भेट घडवून आणली. या घटनेने राजूच्या कुटुंबाला आठ वर्षांनी हरवलेला आनंद परत मिळाला.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *