इंदूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी (१० ऑगस्ट २०२५) इंदूर येथे ‘श्री गुरुजी सेवा न्यास’ या सार्वजनिक संस्थेद्वारे चालवल्या जाणाऱ्या माधव सृष्टी आरोग्य केंद्र आणि कॅन्सर केअर सेंटरच्या उद्घाटनावेळी सांगितले की, “शिक्षण आणि आरोग्य या दोन्ही गोष्टी सध्याच्या काळात सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत.”ते म्हणाले की, “पूर्वी सामाजिक सेवेचा भाग असलेल्या शाळा आणि रुग्णालयांचे मोठ्या प्रमाणावर व्यावसायिकीकरण झाल्यामुळे आरोग्यसेवा आणि शिक्षण सर्वसामान्यांसाठी महाग झाले आहे. शिक्षण आणि आरोग्य ह्या दोन्ही गोष्टी समाजासाठी अतिशय आवश्यक आहेत, पण दुर्दैवाने आज त्या खूप खर्चिक बनल्या आहेत.” भागवत पुढे म्हणाले, “आजचे युग हे शिक्षणाचे युग आहे. शिकण्यासाठी शरीर निरोगी असणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे निरोगी शरीर असल्याशिवाय आपण हुशार होऊ शकत नाही. माणूस आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी आपले घर विकतो आणि स्वतःच्या उपचारांसाठीही घर विकू शकतो. परंतु, ह्या दोन्ही गोष्टी सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत, हे दुर्दैवी आहे.”
“देशात रुग्णालये किंवा शैक्षणिक संस्था कमी झालेल्या नाहीत. नवीन रुग्णालये आणि शाळा झपाट्याने बांधल्या जात आहेत, परंतु व्यावसायिकरणामुळे त्या सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत,” असेही ते म्हणाले. एका मंत्र्यांच्या भाषणाचा उल्लेख करत भागवत म्हणाले, “माझ्या ऐकिवात आले आहे की एका मंत्र्याने म्हटले होते की, ‘भारतातील शिक्षण हे अब्जावधी डॉलर्सचा व्यवसाय आहे.’ व्यवसाय हा सामान्य माणसासाठी नसतो, ज्यांच्याकडे पैसा आहे, तेच व्यवसाय करतात.”
ते पुढे म्हणाले, “पूर्वी शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांची काळजी घेत असत आणि डॉक्टर बोलावले नसतानाही रुग्णांच्या घरी जाऊन त्यांची सेवा करत असत, पण आता हे दोन्ही व्यवसाय बनले आहेत. त्यामुळे देशात कमी खर्चात उपचारांची सोय उपलब्ध असणे गरजेचे आहे.” यावेळी आरएसएस प्रमुखांनी कर्करोगाच्या महागड्या उपचारांचा उल्लेख केला. ते म्हणाले, “देशातील फक्त ८ ते १० शहरांमध्ये कर्करोगाच्या उपचाराची चांगली सोय आहे. त्यामुळे रुग्णांना उपचारांसाठी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करून तिथे जावे लागते.” या परिस्थितीवर उपाय म्हणून भागवत यांनी समाजातील सक्षम आणि साधनसंपन्न लोकांनी पुढे येऊन नागरिकांना चांगल्या आरोग्य आणि शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले.
Leave a Reply