मुंबई: राज्यातील ‘जनसुरक्षा’ कायद्याविरोधात संघर्ष समितीच्या वतीने गुरुवारी, १४ ऑगस्ट रोजी मुंबईत जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, उबाठाचे उद्धव ठाकरे व अन्य नेते उपस्थित राहणार आहेत. ‘जनसुरक्षा’ कायद्याच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेच्या माध्यमातून जनसुरक्षा कायद्यातील तरतुदींवर चर्चा केली जाणार आहे आणि पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे. या परिषदेला सामान्य नागरिक, निडर नागरिक व मुस्कटदाबीविरोधात आवाज उठवणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे.
या संदर्भात समितीमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी-लेनिनवादी) लिबरेशन, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष, भारत जोडो अभियान, श्रमिक मुक्ती दल यांसारखे डावे पुरोगामी पक्ष आणि संघटनांचा समावेश आहे. महायुती सरकारच्या हुकूमशाही प्रवृत्तीला विरोध करण्यासाठी, सामान्य, निडर नागरिकांच्या मुस्कटदाबीविरोधात आवाज उठवत राहणे आवश्यक आहे. पुढील रणनीती आणि सामूहिक कृती जाणून घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संघर्ष समिती सदस्य आणि महाराष्ट्र भारत जोडो अभियानाचे सामाजिक कार्यकर्ते उल्का महाजन यांनी केले आहे. हे आंदोलन जनसुरक्षा कायद्याचा निषेध करण्यासाठी आणि लोकांच्या हक्कांसाठी लढण्यासाठी आयोजित करण्यात आले आहे. या परिषदेत जनसुरक्षा कायद्यातील अन्यायकारक तरतुदींवर चर्चा केली जाईल आणि सरकारला हा कायदा रद्द करण्यास भाग पाडण्यासाठी पुढील रणनीती आखली जाईल. या परिषदेत मोठ्या संख्येने लोक सहभागी होण्याची शक्यता आहे.
Leave a Reply