नवी दिल्ली/बीड: दिल्लीतील ७९व्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील ९ महिलांसह एकूण १६ सरपंचांना विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. या सन्मानित सरपंचांमध्ये प्रमोद लांडे (लोढेवाडी, जि. सोलापूर), जयश्री इंगळे (खासळा नाका, जि. नागपूर), संदीप ढेरे (कोरेगांव भीमा, जि. पुणे), डॉ. अनुप्रिया भांडे (महातोडी, जि. अकोला), नयना भुसार (भावसे, जि. ठाणे), सुनीता मिटकरी (बोरखेड़ा, जि. वाशिम), अपर्णा राऊत (कोढ़ाला, जि. गडचिरोली), संजीवनी पाटील (खर्ड, जि. अहिल्यानगर), चंद्रकुमार बहेकार (भेजपार, जि. गोंदिया), रोमीना बिसैन (केवळवाडा, जि. भंडारा), सुरज चव्हाण (चिचळी, जि. रत्नागिरी), पार्वती हरकल (कुंभारी, जि. परभणी), प्रमोद जगदाळे (दिघल, जि. सातारा), शशिकांत मांगले (करहेगव्हाण, जि. अमरावती) आणि प्रभावती बिराजदार (बामणी, जि. लातूर) यांचा समावेश आहे.
मस्साजोगच्या सरपंच वर्षा सोनावणे यांनाही खास निमंत्रण
मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर, वर्षा सोनावणे यांनी १ जानेवारी २०२५ पासून सरपंचपदाची जबाबदारी स्वीकारली. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ५ मे २०२४ पासून नाम फाउंडेशन आणि पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने मसाजोग येथे नदी खोलीकरण व तलावातील गाळ काढण्याचे महत्त्वपूर्ण काम करण्यात आले. या कामामुळे गावातील विहिरी आणि बोअरवेलमधील पाण्याची पातळी वाढली असून, संपूर्ण परिसर हिरवागार झाला आहे. या कामाची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आणि दिल्लीच्या जलशक्ती मंत्रालयाकडे अहवाल पाठवला. पंतप्रधानांनी या कार्याचे कौतुक केले. या उत्कृष्ट कार्यामुळे सरपंच वर्षा सोनावणे आणि त्यांचे पती आनंदराव सोनावणे यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून खास निमंत्रण देण्यात आले आहे. हे दाम्पत्य बुधवारी दिल्लीसाठी रवाना झाले.
Leave a Reply