आजचा दिवस… मोठा भाग्याचा! – महेश म्हात्रे

जचा दिवस फार महत्त्वाचा आहे, गोकुळाष्टमी आणि स्वातंत्र्य दिन, एकत्र. गेल्या अनेक वर्षात असा योग आला नव्हता…
ज्ञानेश्वर माऊली आणि भगवान श्रीकृष्ण…. अगदी बालवयातच असंख्य संकटांचा सामना करून मोठे झालेले दोन मातृह्रदयी महापुरूष… दोघेही लहानपणापासून बंडखोर… क्रांतिकारक.
श्रीकृष्णाला जन्मतःच आई वडिलांचा विरह… कारण, कंस राजाची जुलमी राजवट. ज्ञानेश्वरादि भावंडांच्या नशिबी तेच अनाथपण, कारण निर्दयी धर्मसत्ता… तुरुंगातील जन्म हे कृष्णाचे प्राक्तन आणि ब्राह्मणांनी आयुष्यभर वाळीत टाकण्याचा कटू अनुभव, हे लहानग्या ज्ञानेश्वर माऊलींनी मोठ्या मनाने स्वीकारलेले वास्तव.
पण एवढं असूनही दोन वेगवेगळ्या कालखंडात एकाच तिथीला जन्माला आलेल्या या दोन मानवतावादी तत्ववेत्त्यांनी आपल्या दुःखाला विश्वाच्या सुखाशी जोडले आणि “जो जे वांच्छिल तो ते लाहो” असे असीम सौख्याचे पसायदान मागितले. गीता आणि ज्ञानेश्वरीच्या तत्वदर्शनातून असंख्य पिढ्यांना जगण्याची, क्रांतिकारकांना मुक्तीची, लढण्याच्या युक्तीची, बलिदानातून आनंदाची वाट दाखवली… म्हणून आजच्या दिवशी भारतीय स्वातंत्र्य चिरायू होवो ही कामना करताना, स्वतंत्र भारत देशासाठी आयुष्य पणाला लावणार्‍या समस्त देशभक्तांना मनःपूर्वक प्रणाम करताना, स्वातंत्र्य चळवळीत बहुसंख्य नेत्यांना, ज्यांच्या श्री भगवत गीतेने प्रेरणा दिली. आणि ज्ञानेश्वरीने आत्मबळ दिले, त्या भगवान श्रीकृष्ण आणि माऊली ज्ञानेश्वर महाराज या दोन प्रज्ञावंताचे आपण सर्वांनी स्मृतीस्मरण का केले पाहिजे, हे सांगताहेत महाराष्ट्र रिसर्च सेंटरचे संपादक *महेशम्हात्रे*

*स्वातंत्र्य दिन, श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि ज्ञानेश्वर माऊली जन्मदिनी सर्वांना भरपुर शुभेच्छा…*
*जय हिंद, जय श्रीकृष्ण*

आज गोकुळाष्टमी, जगाला जगण्याचे तत्वज्ञान देणाऱ्या गोपाळकृष्णाचा वाढदिवस. पाचेक हजार वर्षांपासून कृष्णाचा वाढदिवस दहीहंडी फोडून , गोपाळकाला करून साजरा करण्याची परंपरा हिंदुस्तानात सुरु आहे. आपल्या एका आयुष्यात , ज्याला भाविक भक्त “अवतार” म्हणतात , त्या अवतारकार्यात मथुरेत जन्मलेला कृष्ण , गोकुळ वृंदावनात वाढला, तेथून पुन्हा कुकर्मी कंसमामाच्या परिपत्याच्या निमित्ताने मथुरा, मग समुद्रातील द्वारका ( काही पुराणवस्तू संशोधकांना त्याचे अवशेष मिळाल्यात म्हणे ) पुन्हा समुद्रार्पण करून भारतवर्षाच्या राजकारणाचे केंद्र असणाऱ्या हस्तिनापूर नगरीत, सध्याच्या दिल्लीपासून शंभरेक किलोमीटर दूर असणाऱ्या मेरठनजीकच्या कौरवांच्या राजधानीत पांडवाचा कैवार घेऊन कृष्ण वावरला आणि महाभारत युद्धाला ३६ वर्षे झाल्यानंतर गुजरातेतील सोमनाथ नजीकच्या प्रभासपट्टण येथे एका शिकाऱ्याच्या बाणाने कृष्णाने इहलोकीची यात्रा संपवली. असा हा जन्मापासून मृत्यूपर्यंत सतत फिरत राहिलेला देव, मनमौजी वाटतो पण तो तसा नाही , त्याच्या प्रत्येक कृतीमागे अनेक अर्थ दडले आहेत. तो सुखोपभोगी वाटतो , पण त्यागाचा उत्तुंग आदर्श सततच उभा करीत जातो . अगदी गोकुळात सुरु असणाऱ्या इंद्रपूजेला विरोध करून बालपणापासून बंडाचा झेंडा फडकावणारा हा गवळ्याचा पोर आयुष्यभर सगळ्यांसाठी लढला, पण आपल्यावर जीव टाकणार्यांकडे पाठ फिरवत तो सतत फिरत राहिला . होय अगदी , वासुदेव – देवकी , नंद-यशोदा या मात्या-पित्याना कंसमर्दनानंतर सोडणारा कृष्ण , राधेच्या , रुख्मिणीच्या आणि सत्यभामेसह असंख्य गोपिकांच्या प्रेमापासूनही कायम दुरावलेला दिसतो…. का वागला असेल असा तो, हस्तिनापुरात महाभारत घडवताना जे काय डावपेच तो टाकत होता, पांडवांना न्याय मिळवून देण्यासाठी झगडत होता, त्या साऱ्या धावपळीत , एकांतात त्याला येत नसेल का आईची आठवण , जन्म देणाऱ्या आणि जीवन देणाऱ्या …?
ज्या गोकुळात त्याच्या बालपणाला आणि थोरपणाला आकार मिळाला , तेथील नंदबाबाचे लाड-कोड त्याला आठवणींच्या वनात नेत नसतील का नेत … ?
जन्मत: आपले लेकरू दुरावणे किती वेदनादायी असते याची वासुदेवाला डसलेली वेदना कृष्णासारख्या चाणाक्ष माणसाला मोठेपणी जाणवली नसेल, असे मला तरी वाटत नाही. कंसाने पाठवलेल्या अक्रूरासवे गोकुळातून मथुरेला बाहेर पडल्यावर त्याचे प्रेम राधेने, गोपिकांनी, वेड्याबागड्या गोपाळांनी गोकुळ-वृंदावनात असे काही जपले की पुढील पिढ्यानपिढ्या कृष्णप्रेमात रंगू लागल्या , आजही रंगतात. मग द्वारका – हस्तिनापुरात उंच महालात निजणाऱ्या कृष्णाला कधी राधेची किंवा पेंद्याची तीव्र आठवण येऊन त्याची झोपमोड झाली असेल का , नसेल आली कोणाची आठवण, तर त्या पूर्ण पुरुषोत्तमाचा राग वाटावा…
पण जेव्हा द्रौपदीच्या वस्रहरणाची वेळ येते तेव्हा कृष्णच पुढे होऊन तिची लाज राखतो . युद्धात शस्त्र खाली टाकून बसलेल्या अर्जुनाला गीता सांगून युद्धप्रवृत्त करतो. त्यासाठी चक्क अर्जुनाचा सारथी होतो. मला कृष्णाच्या या वागण्याचे कायमच कोडे वाटत आलेले , दुसऱ्यांचे आयुष्य आपले मानून ते सुखी, सुरक्षित आणि समृद्ध करण्यासाठी त्याने सतत आपले माणूसपण जपले आणि देवत्व झिडकारले. माणसाने आपले कर्तव्यकर्म मन:पूर्वक करावे , फळाची आशा सोडून सुखाने पुढे चालत राहावे अशी साधी सरळ शिकवण गीतेमधून देणारा कृष्ण आपल्याला पोक्त आणि प्रौढ वाटू शकतो, नव्हे वाटतो . पण मला अधिक भावतो आपल्या घरातील मडके फोडून गोपाळांना आनंद देणारा बाळकृष्ण… खरं तर आपल्या सगळ्यांना त्याचे हे “वाटून खाण्याचं” साधं सोपे तत्वज्ञान आवडतं, पण कृतीमध्ये आणताना पंचाईत होते… त्यामुळे असेल कदाचित दररोजच्या जगण्याला समसमान वाटपाची सवय होईल या आशेने दहीहंडी आणि गोपाळकाला जोषात करण्याची परंपरा सुरू झाली असावी… सध्या ती परंपरा कोणत्या “थराला” पोहोचली आहे, ते आपण सारे जाणता , त्याबद्दल वेगळं बोलण्याची गरज नाही. मात्र गरज आहे आमच्या धर्म आणि उत्सवांचा आणि आमच्या देवी देवतांची नेमकी ओळख करून घेण्याची…
जन्मापासून मृत्यूपर्यंत अनंत आख्यायिकांचा गराडा कृष्णाभोवती पडलेला दिसतो , त्यामुळे त्या भाविक भावनांच्या भावुक भाऊगर्दीत न घुसता बहुरंगी, बहुढंगी जगणं जगणारा, बहुगुणी, बहुरूपी कृष्ण समजून घेण्यासाठी , अगदी श्रीकृष्णाच्या वाढदिवशीच जन्मलेल्या ज्ञानेश्वर महाराज यांच्या शब्दातून प्रगटलेले संत साहित्य अभ्यासले, तरी कृष्णाच्या आयुष्याचा आनंद ठेवा आपापल्या भूमिकेनुसार हाती लागू शकतो ..
ज्ञानेश्वर माऊलींनी श्रीमद भगवत गीता, मराठीमध्ये आणताना फक्त भाषांतर केले नाही, आपल्या सोईचे अर्थ काढून स्वतःच्या पांडित्याचं प्रदर्शन केले नाही… तर त्यांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपल्याला झालेलं जीवन दर्शन तुम्हाआम्हाला होईल असे रेखीव, कोरीव शब्दलेणे तयार केले, जे आजही अमिट आहे, अभंग आहे… अर्थगर्भ ज्ञानेश्वरी असो भक्तीमधुर हरिपाठ किंवा कृष्ण प्रितीचा उत्कट उत्सव असणार्या विराण्या असो… मन माऊलींच्या शब्दलेण्यात हरवून जातं…. गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या अप्रतिम स्वरांनी आपल्या पर्यंत आलेले असेच एक प्रेमरसाने ओथंबलेलं काव्यशिल्प सोबत देत आहे…
अवचिता परिमळू, झुळुकला अळुमाळू ।
मी म्हणु गोपाळू, आला गे माये ॥१॥

चांचरती चांचरती बाहेरी निघाले ।
ठकचि मी ठेलें काय करू ॥२॥

तो सावळा सुंदरू कांसे पितांबरू ।
लावण्य मनोहरू देखियेला ॥३॥

बोधुनी ठेलें मन तव जालें आन ।
सोकोनी घेतले प्राण माझे गे माये ॥४॥

बाप रखुमादेवीवरू विठ्ठल सुखाचा ।
तेणें काया मने वाचा वेधियेलें ॥५॥

आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिन, श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि माऊली ज्ञानेश्वर महाराज जन्मदिननिमित्त भरपुर शुभेच्छा आणि सर्वांना जय श्रीकृष्ण

महेश म्हात्रे
महाराष्ट्र रिसर्च सेंटर

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *