“झाड जाणावे फुले…माणूस जाणावा बोले” अशी एक म्हण आहे. तिचा प्रत्यय मला सुमारे तेरा वर्षांपूर्वी पुण्यात आला होता. निमित्त होते, पहिल्या वकील परिषदेचे आणि नामवंत विधिज्ञ विठ्ठल कोंडे देशमुख यांच्या भाषणाचे. या राज्यभरातील वकिलांच्या उपस्थितीने गजबजलेल्या अधिवेशनाचा विषय होता, “भारताच्या लोकशाही सक्षमीकरणाच्या कार्यात वकिलांचे योगदान”. आपल्या प्रास्ताविक भाषणात बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे अध्यक्ष या नात्याने विठ्ठल कोंडे देशमुख यांनी फार सुंदर शब्दात वकिलांच्या भूमिकेची मांडणी केली होती. ती आजही स्मरणात आहे. ते म्हणाले होते की, “कायदा आणि लोकशाही यांचा दृढ ऋणानुबंध आहे. हे विषय एकमेकांपासून वेगळे करता येत नाहीत. कायदा आणि लोकशाही किंवा राजकारण हे जरी वेगळे विषय असले तरी, त्यांचा एकमेकांवर प्रभाव पडतो. कायदा आणि राजकारण हे दोन्ही समाजासाठी अपरिहार्य विषय आहेत. म्हणून, कायदा आणि राजकारण नेहमीच हातात हात घालून चालतात. त्यामुळेच असेल कदाचित, आपण स्वातंत्र्यपूर्व काळापासून पाहत आलो आहोत की, समाजाचे प्रश्न कायदेशीर मार्गाने, तर कधी सविनय कायदेभंग करून सोडविणारे, वकीलच चांगले लोकनेते, राष्ट्रपुरुष बनतात.
भारताच्या स्वातंत्र्य आंदोलना दरम्यान, महात्मा गांधीं, जवाहरलाल नेहरूंपासून डॉ राजेंद्र प्रसाद यांच्यापर्यंत. लोकमान्य टिळक, घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून तर सरदार वल्लभ भाई पटेल यांच्यापर्यंत. अनेक कायदेतज्ज्ञ आघाडीवर लढत होते, ज्यामुळे भारताला स्वातंत्र्य मिळाले. भारतीय राजकारणाच्या क्षेत्रात ज्या नामवंत वकिलांनी योगदान दिले आहे, त्यांची नावे वाचल्यावर आपल्या लक्षात येईल की, जर ते नसते तर भारताचे स्वातंत्र्य कठीण झाले असते. स्वातंत्र्य मिळून आज पंच्च्याहत्तर वर्षे उलटली आहेत. पण देशातील परिस्थिती फारशी बदलली नाही. आजही सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी न्याय व्यवस्थेकडे लोक आशेने पाहतात. म्हणून वकिलांनी, त्यांच्या संघटनांनी जास्त जबाबदारीने वागले पाहिजे. १९५८ मध्ये, भारतात सुमारे ७५,००० वकील होते. म्हणजे दर दशलक्ष लोकसंख्येमागे १८३ वकील, असे प्रमाण होते. आज दर तीनशे लोकांमागे एक वकील आहे. पण तरीही लोक न्यायाच्या प्रतीक्षेत असलेले दिसतात. हे चित्र बदलले पाहिजे. “, हे कोंडे – देशमुख यांचे समर्पक विश्लेषण आणि लोकांशी असलेली बांधिलकी, त्यांच्या न्यायनिष्ठेचे द्योतक आहे.
पुणे जिल्ह्यातील रांझे गाव, तेथील जुलमी पाटलाची गोष्ट, ठाऊक नाही, असा मराठी माणूस पाहायला मिळणार नाही. कारण वयाच्या सोळाव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला न्याय निवाडा, आजही महाराजांचा वारसा अभिमानाने मिरवणारा प्रत्येक मराठी माणूस जाणतो. स्वराज्यात गैरवर्तन करणाऱ्याला शिक्षा होणारच, हा इतिहास ज्या गावात पहिल्यांदा घडला, त्याच गावात विधिज्ञ विठ्ठल यांचा जन्म झाला, प्राथमिक शिक्षणही त्याच शिव पदस्पर्शाने पावन झालेल्या गावात झाले. मावळ प्रांतातील शेतकरी कुटुंबात शेती हेच पारंपरिक उपजीविकेचे साधन असल्यामुळे शिक्षणाचा प्रवास बराच खडतर होता. त्यात बारावीत नापासचा शिक्का बसल्यामुळे, आधीच अवघड असलेला प्रवास थांबणार की काय असा एक क्षण तरुण विठ्ठल यांच्या आयुष्यात आला होता. पण काका रामचंद्र आणि चुलत भाऊ वामन यांच्या मदतीने मुंबईचा महामार्ग सापडला. जिथे अफाट कष्ट, हालअपेष्टा विठ्ठल यांची वाट पाहत होत्या. त्यातून सुरु झाला नवीन जीवन संघर्ष. पण यात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, अपयशाने, कष्टाने विठ्ठल यांची वाट रोखण्याचा प्रयत्न केला. पण त्या संकटांच्या डोंगरांवर ते हसतमुखाने स्वार होत गेले. ज्या वयात मुले कॉलेज जीवनाचा आनंद घेत असतात, त्यावयात ते काम करून शिकत होते. आज कुणाला सांगूनही पटणार नाही की, मुंबईतील आंबेडकर कॉलेज, न्यू लॉ कॉलेज येथे शिक्षण घेताना, विठ्ठल, दादरच्या प्रसिद्ध रुपसंगम या साडीच्या शो रूममध्ये सेल्समन म्हणून काम करत होते. जिथे, त्यांच्यातील बोलण्याच्या कौशल्याची पहिली चुणूक दिसली होती. त्यामुळेच असेल कदाचित, रुपसंगमचे मालक चापसीभाई शहा यांची त्यांच्यावर विशेष मर्जी बसली होती.
दरम्यान न्यू लॉ कॉलेज मध्ये दुसऱ्या क्रमांकाने कायद्याची पदवी मिळवून विठ्ठल सनद घेऊन बाहेर पडल्यावर, १९९१ मध्ये, आता काय करावे हा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला होता. एका सुप्रसिद्ध वकिलांनी त्यांना गावी जाऊन प्रॅक्टिस करण्याचा सल्ला दिल्याने, द्विधा मनस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी न्या व्ही.एम. कानडे देवासारखे भेटले. त्यांनी गावी जाऊन प्रॅक्टिस करण्याच्या विचारात असणाऱ्या विठ्ठलना, एल एल एम करण्याचा सल्ला दिला. ज्यामुळे कानडे यांच्यासारख्या नामवंत विधिज्ञाच्या हाताखाली कायद्याचे ‘प्रत्यक्ष’ शिक्षण आणि विद्यापीठ वसतिगृहात राहण्याची व्यवस्था, असा दुहेरी लाभ झाला. आणि तोच विठ्ठल यांच्या आयुष्यातील महत्वाचा टर्निंग पॉईंट ठरला. तिथूनच सुरु झाला न्यायमार्गावरील प्रवास, माझी त्यांची ओळख त्याच ‘स्ट्रगल’ काळातील. जगन्नाथ शंकर शेठ हॉल, या मुंबई विद्यापीठाच्या हॉस्टेल मध्ये कोंडे देशमुख सोबत सुनील लाड, गौतम चोपडे आणि मी, आम्ही सारे एकत्र राहत होतो. अर्थात कायद्याचा अभ्यास करणारे अन्य मित्रमंडळी होतीच. या कायद्याच्या वाटेवरील नामवंत सहप्रवासी होते, न्या किशोर संत, न्या गिरीश कुलकर्णी, न्या अभय अहुजा,न्या अजय गडकरी,न्या आर एम जोशी, न्या माधव जामदार, न्या राजेश पाटील, ख्यातनाम विधिज्ञ राजेश बेहरे आणि अनेक नामवंत. त्यांच्या सोबत विठ्ठल कोंडे – देशमुख नामक हिऱ्याला चमक लाभत गेली . पण खरे पैलू पडले ते सहाय्यक सरकारी वकील म्हणून कामाला सुरुवात केल्यावर . विधिज्ञ विजय पाटील, बी आर पाटील आणि न्या ताहिलरमणी यांच्या तालमीत कोंडे – देशमुख यांच्या कार्यकर्तृत्वाला खरा आकार मिळाला. तर तत्कालीन बार कौन्सिल अध्यक्ष न्या दिलीप भोसले यांच्या प्रेरणेने कोंडे – देशमुख यांनी स्वतःला संघटनेच्या कामात झोकून दिले. १९९३ मध्ये ऍडवोकेट्स असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया मध्ये कार्यकारी समिती सदस्य म्हणून कोंडे – देशमुख यांचा प्रवेश झाला. तेव्हापासून त्यांनी मागे वळून पाहिलेले नाही. पुढे, १९९७ मध्ये, या प्रतिष्ठित संस्थेचे खजिनदार, त्यानंतर २००४ – २००६ दरम्यान उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले. २०१० मध्ये बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे सदस्य म्हणून निवडून आलेल्या कोंडे देशमुख यांना,अवघ्या दोनच वर्षात बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवडले गेले. या प्रवासादरम्यान कोंडे देशमुख यांनी महाराष्ट्र – गोवा आणि देशाच्या विविध राज्यातील वकीलांशी, वकील संघटनांशी ज्यापद्धतीने संपर्क आणि संबंध प्रस्थापित केला, तेच त्यांच्या यशाचे गुपित आहे.
साधारणतः लोक मोठ्या पदावर गेल्यानंतर आपल्या भूतकाळाला झटकून टाकण्याचा प्रयत्न करतात. कोंडे – देशमुख हे व्यक्तिमत्व आपली जुनी नाती जपणारे आहे. म्हणून त्यांच्या गावात, खेड- शिवापूरमध्ये त्यांनी आपला संपर्कसेतू मनोभावे जपला आहे. त्यांच्या वाटचालीत सुविद्य पत्नी वैशाली, तरुण विधिज्ञ पुत्र आदर्श आणि अश्वारोहणपटू कन्या मैथिली यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे २०२५ मध्ये पुन्हा एकदा विठ्ठल कोंडे – देशमुख, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवडले गेले. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे, महाराष्ट्राचे सुपुत्र , सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या पहिल्या सत्कार सोहळ्याच्या आयोजनाचा मान त्यांना मिळाला. महाराष्ट्राच्या न्यायविश्वात ‘न भूतो न भविष्यती’ असा सत्काराचा कार्यक्रम पाच हजार वकिलांच्या साक्षीने पार पडला. त्या अविस्मरणीय अशा भव्य – दिव्य सोहळ्याच्या आयोजनातून, पद्धतशीर नियोजनातून कोंडे – देशमुख यांनी आपली निवड सार्थ ठरवली. हा कार्यक्रम संपल्यानंतर, सर्व मान्यवर मार्गस्थ झाल्यानंतर, कोंडे – देशमुख यांच्या भोवती जमा झालेला सहकारी वकील मित्रांचा प्रचंड घोळका आणि सेल्फी काढण्यासाठी धडपडणारे असंख्य हाथ पाहताना एक जुनी आठवण आली . एकदा कोंडे – देशमुख यांच्या मातोश्री म्हणाल्या होत्या, “पंढरपुरातील पांडुरंगाभोवती पांढरे शुभ्र कपडे घातलेल्या वारकऱ्यांची गर्दी असते. आमच्या विठ्ठलाभोवती काळ्या कोटवाल्या वकिलांचा गराडा असतो”.
आज विठ्ठलराव यांचा वाढदिवस आहे… त्यानिमित्ताने हार्दिक शुभेच्छा !
महेश म्हात्रे
संचालक
महाराष्ट्र रिसर्च सेंटर
Leave a Reply