छत्रपती संभाजीनगर: महाराष्ट्रातील ई-वाहनधारकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. लवकरच नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासह, मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे आणि अटल सेतू यांसारख्या प्रमुख महामार्गांवर ई-वाहनांना टोलमुक्त प्रवास करता येणार आहे. ई-वाहनांना टोलमधून सूट देण्याबाबत परिवहन विभागाने चाचपणी सुरू केली असून, हे काम अंतिम टप्प्यात आहे. सध्या, समृद्धी महामार्गावर हलक्या मोटार वाहनांसाठी प्रति किलोमीटर २४ रुपये टोल आकारला जातो. मात्र, आता ई-वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांचा वापर वाढवण्यासाठी शासनाने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जर हा निर्णय प्रत्यक्षात आला, तर ई-वाहनधारकांचा मोठा फायदा होणार आहे.
तिन्ही मार्गांवर तपासणी सुरू
या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी महामार्ग तयार करणारी यंत्रणा, टोल गोळा करणारी यंत्रणा, वाहनांची नोंद ठेवणारी यंत्रणा आणि परिवहन विभाग एकत्र येऊन काम करत आहेत. या तिन्ही मार्गांवर प्रत्यक्षात ई-वाहने नेऊन टोल कापला जातो की नाही, याची तपासणी केली जात आहे. परिवहन विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ई-वाहनांना टोल लागणार नाही, याची खात्री करण्यासाठी तांत्रिक पडताळणी केली जात आहे. हा निर्णय राज्याच्या पर्यावरणपूरक धोरणांना चालना देईल आणि ई-वाहनांचा वापर वाढवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी अपेक्षा आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या १७६ ई-चारचाकी आणि ४८ ई-बसेस आहेत. टोलमुक्त प्रवासाच्या सुविधेमुळे या आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता आहे.
Leave a Reply