मुंबई : राज्यातील वाहतूक आणि शहरी विकासासंदर्भातील अनेक महत्त्वाचे निर्णय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले. या बैठकीत मुंबई व राज्यातील प्रवाशांना दिलासा देणारे पाच मोठे निर्णय जाहीर करण्यात आले असून त्याचा थेट फायदा लाखो प्रवाशांना होणार आहे. उपनगर रेल्वे सेवेत प्रवाशांच्या वाढत्या ताणाचा विचार करता एकूण २६८८ एसी गाड्या खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या गाड्यांमध्ये मेट्रोप्रमाणेच बंद दरवाज्याची सोय, उच्च दर्जाच्या सोयी-सुविधा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर असेल. जुन्या गाड्यांच्या तुलनेत या एसी गाड्यांमुळे प्रवास अधिक सुरक्षित, आरामदायी व जलद होणार आहे.
बैठकीत मुंबई मेट्रो प्रकल्पालाही मोठा दिलासा देण्यात आला. मेट्रो मार्ग ११ (वडाळा-छेर्डा) या प्रकल्पाला हिरवा कंदील देण्यात आला असून, या मार्गावरील कामाला गती मिळणार आहे. तब्बल १२ किमी लांबीचा हा मार्ग वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया असा असेल. या प्रकल्पामुळे दक्षिण मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. याशिवाय ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत २५ किमी लांबीचा एलिव्हेटेड रस्ता उभारण्यासही मंजुरी देण्यात आली. या रस्त्यामुळे ठाणे, नवी मुंबई आणि विमानतळ परिसर यांच्यातील वाहतूक अधिक वेगवान व सुलभ होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, “या निर्णयांमुळे मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर अशा प्रमुख शहरांच्या आधुनिक वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा मिळणार असून, विकासकामांना गती मिळेल.” या निर्णयांमुळे मुंबईकरांचा प्रवास केवळ आरामदायीच नाही, तर जलद आणि सुरक्षितही होणार आहे. राज्यातील पायाभूत सुविधांच्या विकासात हा टप्पा मैलाचा दगड ठरणार आहे.
Leave a Reply