तुळजापूर : तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिरातील जीर्णोद्धाराच्या कामांमुळे मागील २० दिवसांपासून बंद असलेली धर्मदर्शन आणि देणगीदर्शनाची सुविधा आज, २१ ऑगस्टपासून पुन्हा सुरू झाली आहे. यामुळे भाविकांना आता कमी वेळेत आणि जवळून देवीच्या मूर्तीचे दर्शन घेता येणार आहे. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने याबाबत माहिती देत भाविकांची प्रतीक्षा संपल्याचे जाहीर केले आहे.
मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम १ ऑगस्टपासून सुरू झाले होते. यामध्ये गाभाऱ्यातील आणि सिंह गावाच्यातील काही कामे पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली हाती घेण्यात आली होती. या कामांमुळे १ ते १० ऑगस्ट या कालावधीत धर्मदर्शन आणि देणगीदर्शन बंद ठेवण्यात आले होते. मात्र, कामाचा वेग आणि काही तांत्रिक कारणांमुळे ही मुदत १० दिवसांनी वाढवण्यात आली होती. आता जीर्णोद्धाराचे आवश्यक टप्पे पूर्णत्वाकडे गेल्याने पुरातत्व विभागाच्या परवानगीनंतर ही विशेष दर्शन सुविधा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय मंदिर संस्थानने घेतला आहे.
मंदिर संस्थानचे व्यवस्थापक तहसीलदार अरविंद बोळगे यांनी सांगितले की, भाविकांना आता चोपदार दरवाज्यापासून कमी वेळेत दर्शनाची सोय उपलब्ध होणार आहे. यामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तुळजाभवानी मंदिर हे महाराष्ट्रातील प्रमुख शक्तिपीठांपैकी एक असून, दररोज हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. दर्शन सुविधा बंद असल्याने अनेकांना त्रास सहन करावा लागला होता. आता ही सुविधा सुरू झाल्याने भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मंदिर प्रशासनाने भाविकांना सहकार्य करण्याचे आणि दर्शनासाठी शिस्त पाळण्याचे आवाहन केले आहे.
Leave a Reply