लातूर: वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या यादीनुसार, लातूर पॅटर्नने राज्यात पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. येथील तब्बल १२०३ विद्यार्थ्यांनी शासकीय आणि निमशासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवला आहे. वैद्यकीय शिक्षण संस्थांच्या निवड यादीत लातूर पहिल्या स्थानावर असून, नांदेड दुसऱ्या आणि छत्रपती संभाजीनगर पाचव्या स्थानावर आहे.
गुणवत्तेची खात्री आणि कठोर परिश्रमाचे यश
वैद्यकीय प्रवेशासाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लातूर हे एक प्रमुख केंद्र बनले आहे, कारण येथील शिक्षणाची गुणवत्ता सर्वोत्कृष्ट मानली जाते. पहिल्या प्रवेश यादीमध्येच लातूरच्या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी केली असून, अंतिम यादी आल्यानंतरही ही आघाडी कायम राहील अशी अपेक्षा आहे. ‘नीट’ प्रवेश प्रक्रियेतील अव्वल कामगिरीमागे स्थानिक नामांकित महाविद्यालये, कोचिंग क्लासेस आणि मार्गदर्शक शिक्षकांचा अभ्यास केंद्रीत दृष्टिकोन, विद्यार्थ्यांची शिस्त, मेहनत आणि योग्य नियोजन ही प्रमुख कारणे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
जिल्हानिहाय निवड झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या:
* लातूर – १२०३
* नांदेड – ९३६
* पुणे – ८०३
* मुंबई शहर – ७८४
* छत्रपती संभाजीनगर – ५९९
राष्ट्रीय स्तरावरही लातूर पॅटर्नचा प्रभाव
जेईई प्रवेशपूर्व परीक्षेचे समूहसंचालक, सचिन बंग यांच्या मते, लातूरच्या विद्यार्थ्यांनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर राष्ट्रीय पातळीवरही आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. यंदा जवळपास ४० हजारांहून अधिक विद्यार्थी एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएएमस यांसारख्या विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी पात्र ठरले आहेत. या यशामागे लातूरच्या शैक्षणिक प्रणालीचा राष्ट्रीय स्तरावर वाढता प्रभाव दिसून येतो, असे बंग यांनी सांगितले.
Leave a Reply