मुंबई : विधानपरिषदेत मंत्री माणिकराव कोकाटे रमी खेळत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना कोकाटे यांनी मानहानीची नोटीस बजावली आहे. रोहित पवार यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये हा व्हिडिओ शेअर करून सरकार व कृषीमंत्र्यावर टीका केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी, “राज्यात रोज आठ शेतकरी आत्महत्या करत आहेत, अशा परिस्थितीत कृषिमंत्री मात्र रमी खेळण्यात व्यस्त दिसतात,” अशी टीका केली होती.
याशिवाय, “सरकारला पीकविमा-कर्जमाफीची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांचे आर्त ऐकू येते का?” असा सवाल उपस्थित केला होता. तसेच, “सत्तेतील राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीही करता येत नाही,” अशा शब्दांत त्यांनी टोला लगावला होता. या विधानांमुळे आपली मानहानी झाल्याचा दावा करत कोकाटे यांनी रोहित पवारांना नोटीस पाठवली. कोकाटेंच्या मते, पवार यांनी व्हिडिओ पोस्टसोबत मानहानीकारक आरोप केले असून त्यासाठी कायदेशीर कारवाई आवश्यक आहे.
दरम्यान, रोहित पवार यांनी यावर प्रत्युत्तर देताना, “तुम्ही पाठवलेली नोटीस मजेशीर आहे. ती वाचून हसू आवरत नाही. पण मी पुराव्याशिवाय कधीही बोलत नाही. तुम्ही पत्ते खेळत होतात हे मी पुराव्यासकट सिद्ध केले आहे आणि आवश्यक असल्यास आणखी पुराव्यासकट सिद्ध करेन,” असे स्पष्ट केले. या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. सरकार व विरोधक यांच्यातील संघर्षाला यामुळे नवे वळण मिळाले असून आगामी काळात यावरून मोठा वाद रंगण्याची चिन्हे आहेत.
Leave a Reply