मराठी पत्रकारितेतील एक अग्रगण्य नाव,
ठाणे जिल्ह्यातील समस्या सोडवणारे हक्काचे व्यासपीठ आणि ध्येयवादी पत्रकारितेचा आदर्श असणारे दैनिक “ठाणेवैभव” आज ५१ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. संस्थापक संपादक स्व नरेंद्र बल्लाळ यांच्या ध्येयनिष्ठ पत्रकारितेचा वसा मन:पूर्वक जपणाऱ्या समस्त बल्लाळ कुटुंबाला, तसेच ‘ठाणे वैभव’च्या संपादकीय, छपाई, जाहिरात , वितरण विभागातील बंधू – भगिनींना हार्दिक शुभेच्छा.
सुमारे ३७ वर्षांपूर्वीं, ठाणे विधी महाविद्यालयात शिकत असताना, मी पहिल्यांदा “ठाणे वैभव” च्या कार्यालयात एक बातमी देण्यासाठी गेलो होतो. आजही तो दिवस लख्ख आठवतो. तेव्हा माझ्या सोबत होते, संतोष पाटील – जोहेकर आणि ज्येष्ठ विधिज्ञ प्रदीप टिल्लू. बातमीचा विषय होता, अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करणाऱ्या श्याम मानव यांचे भाषण. सांस्कृतिकदृष्ट्या उदारमतवादी असणाऱ्या ठाण्यात शिवसैनिकांनी तेव्हा श्याम मानव यांचा कार्यक्रम उधळून लावला होता. कारण होते, त्यांनी आपल्या भाषणात हिंदू धर्मावर केलेली टीका. खरंतर, मानव असे काहीतरी बोलतील आणि ते काहीही वादग्रस्त बोलले की त्यांचे भाषण बंद पडायचे, असे तत्कालीन ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी ठरवले होते. कारण शिवसेनेने धोरणात्मक दृष्टीने कात टाकण्याचा तो काळ होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठीचा मुद्दा बाजूला ठेऊन, आक्रमक हिंदुत्वाचे धोरण स्वीकारले होते. ज्याची सर्वत्र दहशत होती. त्यातही ठाण्यात एकदा का दिघे साहेबांनी एखाद्या गोष्टीला विरोध केला, तर त्यांच्या पुढे जाण्याची कोणाची प्राज्ञा नसे. पण आम्ही आमच्या “कोकण विद्यार्थी आघाडी”च्या माध्यमातून या दहशती विरोधात उभे राहायचे ठरवले होते. पहिल्याच प्रयत्नात ठाण्यातील तीन पैकी दोन महाविद्यालयात आमचे “विद्यापीठ प्रतिनिधी” निवडून आले होते. त्यामुळे तसाही आमचा आत्मविश्वास वाढला होता. शिवाय, नव्याने उभी राहिलेली आगरी सेना, तिचे संस्थापक सेनापती राजाराम साळवी, त्यांचे बंधू आणि तत्कालीन महापौर मनोहर साळवी यांचे सुरक्षा कवच आमच्याभोवती उभे राहिले होते. त्यामुळे,आम्ही आनंद दिघे यांच्या विरोधाची तमा नबाळगता, श्याम मानव यांचा कार्यक्रम पुन्हा गडकरी रंगायतनमध्ये आयोजित केला होता. खुद्द महापौर मनोहर साळवी अध्यक्षस्थानी असल्यामुळे कार्यक्रमाला पोलीस संरक्षण मिळण्याची खात्री होतीच… तर त्याच कार्यक्रमाची बातमी देण्यासाठी आम्ही संपादक नरेंद्र बल्लाळ यांच्या समोर बसलो होतो. आमच्याकडे चष्म्यातून निरखून पाहणाऱ्या त्यांच्या अनुभवी नजरेला बरंच काही दिसत होतं. त्यामुळे, ते एकामागून एक प्रश्न विचारत होते. मी आणि संतोष बोलत होतो… “तुम्ही या कार्यक्रमासाठी पोलिसांकडे परवानगी घेतली आहे का ?” या प्रश्नावर मात्र आमची बोलती बंद झाली. कारण पोलिसांनी, आधीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहिलेला असल्याने, पुन्हा, मानव यांच्या भाषणाला अनुमती देणार नाहीत, याची कल्पना होती. त्यामुळेच, आम्ही पोलिसांना नकळविता कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरवले होते. बल्लाळ सरांच्या त्या प्रश्नावर तरुण वकील प्रदीप टिल्लू तात्काळ उत्तरले, “कालच अर्ज देऊन आलोय, पोलीस स्टेशनला. उद्यापर्यंत पोलीस परवानगी येईल हातात.” त्यांच्या या तत्परतेने, वातावरणातील तणाव आणि आमचे दडपण उतरले. पण त्यानंतर जेव्हा जेव्हा ठाणे वैभवच्या कार्यालयात गेलो, तेव्हा नरेंद्र बल्लाळ सरांशी हमखास बोलणे होई. पण बोलताना, ते कोणता प्रश्न विचारतील, याचे अनामिक दडपण मनावर कायम असे. ठाणे आणि मुंबईत फार अंतर नसले तरी, त्या काळातील मुंबईची वृत्तपत्रे ठाणेकरांपासून फार “दूर” होती.
ठाणे जिल्ह्याची ५० वर्षे सेवा केल्याच्या सन्मानार्थ ठाणे महापालिकेने, आज आग्रा रोडवरील चौकास “ठाणे वैभव”चे नाव दिले. परिवहन मंत्री प्रताप सारनाईक यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण झाले.
२१ एप्रिल १९८९ रोजी ठाणे वैभव मध्ये प्रकाशित झालेली आमची बातमी 👆
ठाण्यातील बहुतांश तरुण कार्यकर्त्यांसाठी ठाणे वैभव आणि संपादक स. पां. जोशी यांचे दैनिक सन्मित्र हे प्रसिद्धी देणारे आधारवड होते. कोणताही कार्यक्रम होण्याआधी आणि नंतर या दोन वृत्तपत्र कार्यालयांना भेट देणे आणि बातमी छापून येणारच, हा विश्वास घेऊन तेथून बाहेर पडणे, हे आमच्यासारख्या नवख्यांसाठी एक अत्यावश्यक ‘रिच्यूअल’ बनले होते. कारण बाह्य देखावा नसलेल्या या हक्काच्या दैनिकांनी वाचकांच्या मनात तेव्हढे मोठे स्थान मिळवले होते. मुंबईहून निघणाऱ्या लोकसत्ता , महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, नवाकाळ आदी दैनिकांचा वाचकवर्ग अफाट होता. त्यांची पाने, बातम्या आणि लेखांची संख्या जास्त होती. तरीही ठाणे वैभव, सन्मित्र सारखी जिल्हा केंद्रित दैनिकं, प्रामाणिक पत्रकारितेच्या जोरावर, त्या झंझावातात टिकून होती. पुढे रंगीत छपाई, बहु आवृत्ती साखळी वृत्तपत्रे आली. एकेका जिल्ह्याच्या दोन दोन , चार चार आवृत्त्यांची लाट आली. बोल बोलता, “फोटो फ्रेमची दिमाखदार चौकट”, असे ज्यांचे शोभेपुरते स्थान होते त्या, जाहिरातींनी बातम्यांच्या जागी, मुख्य फोटोच्या जागेत घुसखोरी केली. परिणामी एकविसाव्या शतकात, बातमीला जाहिरातीचे परिमाण लाभू लागले. जाहिरात मॅनेजरचे गुण असणारे लोक संपादक बनू लागले. मुंबईच्या वृत्तपत्र विश्वातील हे वारे “मुंबईचा उंबरठा” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे शहरात तात्काळ नपोहचले तरच नवल होते. पण त्यातही, ठाणे वैभवने प्रयोगशीलता, कल्पकता, कठोर परिश्रम, सातत्य आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन, या “पंचशील” तत्वांच्या बळावर कुण्या नेत्याचे नव्हे, तर सर्वसामान्य “वाचकांचे दैनिक” ही आपली ओळख सोशल मीडियाच्या सर्वव्यापी माहिती सागरात कायम ठेवली, हे विशेष आहे. कारण आपण सर्वच जाणतो की, आजच्या काळात सोशल मीडिया हा जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. संवाद, माहितीची देवाणघेवाण आणि “ओळख” निर्माण करण्यासाठी तो उपयुक्त ठरतो. तरुणांना त्यातून रोजगार, प्रसिद्धी आणि कौशल्य दाखवण्याची संधी मिळते. समाजातील जनजागृती, लोकशाहीतील सहभाग वाढवण्यामध्येही सोशल मीडियाचा मोलाचा वाटा आहे. पण याच माध्यमाचे तोटेही तितकेच गंभीर आहेत. खोटी माहिती, फेक न्यूज, अफवा, सायबर गुन्हे, फसवणूक आणि गोपनीयतेचा भंग यामुळे व्यक्ती आणि समाज धोक्यात येऊ शकतात. काही वेळा परिस्थिती हाताबाहेर जाऊन सरकारला सोशल मीडियावर, वेबसाइट्स , ऍप्सवर बंदी घालावी लागते. जिथे इंटरनेट वारंवार बंद करावे लागते, अशा मोजक्या देशांमध्ये भारताचे स्थान खूप वरचे आहे. म्हणून आपण सर्वानी सोशल मीडियाचा उपयोग करताना सजग राहणे आणि त्याचा मर्यादित वापर करणे आवश्यक आहे. “सोशल डायट” म्हणजेच संयमित वापरच आपल्याला सोशल मीडियाच्या दुष्परिणामांपासून वाचवू शकतो, असे माझे मत आहे. अर्थात हे समाज माध्यम कितीही जीवनव्यापी झाले तरीही प्रिंट मीडियाचे स्वतःचे एक स्थान आहेच. माध्यमं कितीही बदलली तरी शब्दांच्या सामर्थ्याचे रंग कधीही फिके होणार नाहीत. मानवी विचारांचा उगम जिथे होतो, ती सजीव संवेदना हेच संवादाचे खरे स्वरूप आहे. म्हणून कदाचित “डेथ ऑफ़ अ सेल्समैन” लिहिणारे ख्यातनाम नाटककार आर्थर मिलर सांगतात की, “A good newspaper, I suppose, is a nation talking to itself”. अर्थात त्यांच्याही खूप आधी, एकोणिसाव्या शतकात, लोकहितवादी देशमुख त्यांच्या शतपत्रांमध्ये लिहून गेले आहेत, की “वृत्तपत्र म्हणजे समाजाची बृहत्तर जिव्हा होय”. ते शब्दश: खरे आहे, आज जरी बातम्यांचा वेग “मनाशी टाकिले मागे, गतीशी तुळणा नसे” अशा महाबली इंटरनेटमूळे वाढला असेल, पण त्यातील शब्दांचे अर्थ, अर्थाच्या विविध छटा आणि जाणिवांना जागृत करणाऱ्या संवेदना मात्र तशाच राहतील. महाराष्ट्र टाइम्सच्या नोकरीचा त्याग करून स्वतंत्र दैनिक काढण्याचे धाडस करणाऱ्या स्व नरेंद्र आणि कुमुदिनी बल्लाळ यांच्या पत्रकारितेचा वसा त्यांचे चिरंजीव मिलिंद बल्लाळ समर्थपणे पुढे नेत आहेत. आता बल्लाळ कुटुंबातील पत्रकारितेमधील तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधीत्व करणारे निखिल बल्लाळ यांनी कार्यकारी संपादक म्हणून सूत्रे हाती घेतली आहेत. नव्या युगाच्या आणि नव्या दमाच्या निखिल यांनी नवं माध्यमांशी जुळवून घेत अनेक नवीन उपक्रम राबविले आहेत. त्यामुळे हल्लीच्या सोशल माध्यमांच्या गराड्यात ठाणे वैभव, ठाणेकरांचा विश्वसनीय आवाज बनलेला पाहायला मिळत आहे. गेल्या अर्धशतकाच्या वाटचालीत लाभलेल्या अनुभव संचिताचा फायदा घेऊन, ठाणे वैभवने आता शतकी वाटचाल पूर्ण करण्यासाठी सिद्ध झाले पाहिजे… यासाठी महाराष्ट्र रिसर्च सेंटरच्या वतीने हार्दिक शुभकामना !
Leave a Reply